रयत शिक्षण संस्था काळानुरूप बदलणारी आणि माणसं घडविणारी संस्था : अॅड. भगीरथ शिंदे
श्रीगोंदा | दि. २८ सप्टेंबर २०२६
गणेश कविटकर
सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण होय. याची जाणीव कर्मवीर भाऊराव पाटील यांना होती. त्यामुळेच बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीरांच्या कार्यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीला दिशा मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचे वारसदार होते. आज रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक कर्मवीरांचा विचार आणि कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. रयत ही काळानुरूप बदलणारी संस्था असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत माणसं घडविण्याचे कार्य ती सातत्याने करीत आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी केले.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात रयत संकुलाच्या वतीने आयोजित कर्मवीर जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार उपस्थित होते.
बंडू पवार म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यामागे महात्मा फुले, महात्मा गांधी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा होती. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या विकासासाठी कर्मवीरांनी आयुष्य वेचले. आजच्या युवकांनी कौशल्याधिष्ठित शिक्षण घेऊन व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा.
मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य बाबासाहेब भोस यांनी रयत शिक्षण संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाला दिले जाणारे महत्त्व अधोरेखित केले. कर्मवीरांच्या त्याग व संघर्षाचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनीही कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. रयत शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देणारी नव्हे, तर माणसं घडविणारी संस्था आहे. कर्मवीरांचा विचार आणि मूल्यांचा वारसा रयतच्या माध्यमातून आजही जपला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे यांनी केले. प्रतिमापूजनानंतर श्रीमंत राजमाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सुमधुर स्वरात रयत गीत सादर केले. यावेळी जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल गणेश भोस यांचा, तर पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. देवेंद्र बहिरम यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख संपादक डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी संपादित केलेल्या ‘भगीरथ’ नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य दिलीप भुजबळ आणि मुख्याध्यापिका वर्षा भोईटे यांनी अहवाल वाचन केले.कर्मवीर जयंतीनिमित्त महाविद्यालयात श्रमप्रतिष्ठा दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच रांगोळी, वक्तृत्व, निबंध व पुष्पसजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास सुभाषशेठ गांधी, कुंडलिकराव दरेकर, माजी विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, महावीर पटवा, रवीशेठ दंडनाईक, रत्नप्रभा बोरुडे, ज्योत्स्ना भंडारी, उद्योजक संजय मचे, नगरसेवक, मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर, डॉ. ज्ञानदेव भोसले, पीटर रणसिंग, भगवान गोरखे, गणेश कविटकर, पत्रकार जगताप, पत्रकार कुरुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देवेंद्र बहिरम, प्रा. संजय फटे व प्रा. संदीप दरेकर यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे यांनी मानले.
