श्रीगोंद्यात १५ शाळांची आमदार विक्रम पाचपुतेंकडून पाहणी; कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ‘क्लस्टर स्कूल’चा पर्याय
श्रीगोंदा | दि.३० ऑगस्ट २०२६
गणेश कविटकर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवत आमदार विक्रम पाचपुते यांनी मतदारसंघातील १५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली. शाळांची अवस्था, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची उपलब्धता आणि शैक्षणिक सुविधांचा आढावा घेताना कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ‘क्लस्टर स्कूल’चा पर्याय गांभीर्याने विचारात घेण्याची भूमिका त्यांनी मांडली.
ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, ही काळाची गरज आहे. मात्र केवळ शाळेची इमारत टिकवणे नव्हे, तर त्या शाळेतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळते का, हा खरा प्रश्न असल्याचे पाचपुते यांनी अधोरेखित केले.
कमी पटसंख्येच्या काही शाळांमध्ये एकाच वर्गात विविध इयत्तांचे विद्यार्थी शिकत असल्याने अध्यापनावर मर्यादा येतात. अशा परिस्थितीत शासनाकडून शिक्षक, पोषण आहार आणि अन्य सुविधांवर होणारा खर्च अपेक्षित शैक्षणिक परिणाम साधतो का, याचाही विचार करण्याची गरज आहे. त्याऐवजी काही शाळांचे नियोजनबद्ध एकत्रीकरण करून एका ठिकाणी पुरेसे शिक्षक, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करता येऊ शकते, असा विचार आमदार पाचपुते यांनी मांडला.
“शाळा आपल्या वाडी-वस्तीवरच असावी, यापेक्षा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणे अधिक महत्त्वाचे आहे,” अशी स्पष्ट भूमिका घेत पाचपुते यांनी पालक, शिक्षक, स्थानिक नेतृत्व आणि शाळा समित्यांना या विषयावर सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले. ‘क्लस्टर स्कूल’ ही संकल्पना राबविताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेत पालक, शिक्षक आणि स्कूल कमिटीशी संवाद साधूनच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण शिक्षणव्यवस्थेतील उणिवांकडे केवळ बोट न दाखवता त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न म्हणून आमदार पाचपुतेंचा हा उपक्रम पाहिला जात आहे. आता ‘क्लस्टर स्कूल’च्या माध्यमातून श्रीगोंद्याच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख शिक्षणाची नवी वाट मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘क्लस्टर स्कूल’ म्हणजे…..
कमी पटसंख्या असलेल्या जवळच्या दोन किंवा अधिक शाळांतील विद्यार्थ्यांना एका मध्यवर्ती शाळेत एकत्रित करून तेथे पुरेसे शिक्षक, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, संगणक, क्रीडा तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची संकल्पना. यामुळे शिक्षकांची उपलब्धता वाढण्याबरोबरच विद्यार्थ्यांना विविध उपक्रम, कौशल्याधारित शिक्षण आणि समृद्ध शैक्षणिक वातावरण मिळू शकते. मात्र अशा निर्णयात विद्यार्थ्यांचे अंतर, वाहतूक व्यवस्था, पालकांची भूमिका आणि स्थानिक परिस्थिती यांचा संवेदनशीलपणे विचार करणे आवश्यक राहणार आहे.
