श्रीगोंदा | दि. ०१ जुलै २०२६
गणेश कविटकर
तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे B.Sc. Artificial Intelligence & Machine Learning (AI & ML), B.Sc. Data Science या नव्या पदवी अभ्यासक्रमांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. तसेच विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन B.Sc. Computer Science अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या तुकडीलाही मान्यता देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील ‘A+’ NAAC दर्जा प्राप्त महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि आधुनिक शिक्षणाची तयारी लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांना मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात या अत्याधुनिक अभ्यासक्रमांना शासन मान्यता मिळवणाऱ्या अग्रगण्य महाविद्यालयांपैकी हे एक ठरले आहे.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स या क्षेत्रात देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आतापर्यंत हे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये जावे लागत होते. आता मात्र श्रीगोंद्यातच जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च आणि निवासाचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर इंजिनिअर, डेटा अॅनालिस्ट, AI डेव्हलपर, मशीन लर्निंग इंजिनिअर आदी उच्च वेतनाच्या करिअरच्या संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील युवक-युवतींना आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात स्पर्धात्मक स्थान मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
या अभ्यासक्रमांना मंजुरी मिळवून देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजेंद्रदादा नागवडे आणि संस्थेच्या मार्गदर्शक मा. अनुराधाताई नागवडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, संस्थेचे निरीक्षक सचिन लगड तसेच विश्वस्त मंडळाच्या नियोजन व सहकार्यामुळे हा महत्त्वाकांक्षी उपक्रम साकार झाला.
चालू शैक्षणिक वर्षापासूनच या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होणार असून परिसरातील इच्छुक आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
