चिमुकल्यांच्या दातृत्वातून उभारली १५ मे टन धान्याची बॅक……

श्रीगोंदा | दि. 19 फेब्रुवारी 2026

गणेश कविटकर

 

अग्नीपंख फौंडेशनचा स्व. अजित पवार यांना अनोखा श्रद्धांजलीपर उपक्रम……

 

श्रीगोंदा : लहानग्यांच्या छोट्याशा मुठीत किती मोठी ताकद असते, याचा प्रत्यय श्रीगोंद्यात पुन्हा एकदा आला. “एक मुठ धान्य अनाथांसाठी” या अग्नीपंख फौंडेशनच्या उपक्रमातून तब्बल १५ मेट्रिक टन धान्याचा साठा उभा राहिला. स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना मानवंदना देत हा उपक्रम राबविण्यात आला असून, १७ वसतिगृहांना धान्यरूपी शिदोरी वाटप करण्यात येणार आहे.

राजकारण हा धर्म आणि राज्याचा विकास हेच कर्म मानणाऱ्या नेतृत्वाला अभिवादन करताना, श्रीगोंद्यातील ६१ शाळांमधील विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न थांबता सामाजिक जाणीव जपण्याचा आदर्श घालून दिला. १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या या उपक्रमात हजारो चिमुकल्यांनी आपल्या घरातून आणलेली “एक मुठ” धान्याची देणगी आज अन्नसाठ्याच्या महासागरात रूपांतरित झाली.

धान्य संकलनाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील येळपणे, वांगदरी, श्रीगोंदा, घोगरगाव, बेलवंडी, कोळगाव, इनामगाव, बाबुर्डी आदी ठिकाणी करण्यात आला. या उपक्रमाच्या सांगता समारंभात खासदार निलेश लंके यांनी देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “स्व. अजितदादांच्या स्मृतींना साजेसा हा उपक्रम आहे. या मुलांनी दाखवलेली माणुसकी हीच खरी श्रद्धांजली आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची भावना त्यांच्या मनात रुजली, हे पाहून मन भरून आले.”

अग्नीपंख फौंडेशनचे कार्याध्यक्ष प्रा. संजय लाकूडझोडे यांनी प्रास्ताविकात उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट केले, तर प्राचार्य विशाल डाके व संतोष इथापे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप घावटे यांनी केले.

धान्य वितरणाचा शुभारंभ शिरूर येथील “श्री. मनःशांती छात्रालय” येथे १ मेट्रिक टन धान्य देऊन करण्यात आला. पुढील काही दिवसांत निवडलेल्या १७ संस्थांना अन्नधान्याचे वाटप होणार आहे.

◼ मदतीसाठी निवडलेल्या संस्था…..

अहिल्यानगर, श्रीगोंदा, दौंड, सुपे, राशीन, कर्जत, टाकळी लोणार, मुळेवाडी, पुणे, सातारा आदी ठिकाणच्या विविध अनाथालये, वसतिगृहे व सामाजिक संस्थांचा यात समावेश आहे. त्यामध्ये स्नेहालय, मानवसेवा प्रकल्प अरणगाव, सार्थक सेवा संघ आंबळे, महामानव बाबा आमटे श्रीगोंदा, महात्मा फुले आश्रमशाळा घारगाव, राहुल वसतिगृह श्रीगोंदा, प्राजक्ता मूकबधिर वसतिगृह सुपे, संकल्प वसतिगृह राशीन, स्नेहप्रेम वसतिगृह कर्जत, श्री. मनःशांती छात्रालय शिरूर, दीपस्तंभ मनोबल पुणे, श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग सातारा आदी संस्थांचा समावेश आहे.

एक मुठ धान्य… पण भावनेचा महासागर!

श्रीगोंद्यातील चिमुकल्यांनी दाखवून दिले की, दान हे श्रीमंतीवर नाही तर मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून असते. त्यांच्या या छोट्याशा कृतीतून उभा राहिलेला १५ मेट्रिक टनांचा अन्नसाठा हा केवळ धान्याचा ढीग नसून, तो संवेदनशील समाजाची पायाभरणी आहे.