धर्मवीरांची स्मृती जागवणारा ऐतिहासिक पालखी सोहळा….

छत्रपती संभाजी महाराज यांचा पालखी प्रवास : किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड

श्रीगोंदा | दि. 21 फेब्रुवारी 2026

गणेश कविटकर

श्रीगोंदा : भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पराक्रम, त्याग आणि धर्मनिष्ठेची साक्ष देणाऱ्या भूमीतून यंदा पुन्हा एकदा धर्मवीरांचा जयघोष दुमदुमला. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील किल्ले धर्मवीरगडावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा ऐतिहासिक सोहळा यावर्षी तिसऱ्या वर्षी पदार्पण करत असून संस्थेची ही ९९ वी मोहीम आणि नववे वर्ष विशेष ठरले आहे.

इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि अभिमानास्पद प्रसंगाची साक्ष देणाऱ्या किल्ले धर्मवीरगडावरून ही पालखी मार्गस्थ झाली. धर्मासाठी, स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या संभाजी महाराजांची स्मृती जागवणारा हा सोहळा प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारा ठरला. “संभाजी महाराज कैदेतून निसटून पुन्हा स्वराज्यात परत आले नाहीत” ही इतिहासातील खंत जनमानसात कायम आहे. त्याच भावनेतून धर्मवीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा २५० किलोमीटरचा प्रेरणादायी प्रवास किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड असा नेला जात आहे.

पालखी सोहळ्याच्या प्रारंभी संत शेख महंमद महाराज मंदिरात व शौर्य स्तंभाचे विधिवत पूजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या साक्षीने आणि “धर्मवीर संभाजी महाराज की जय”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. स्थानिक नागरिक, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे सदस्य तसेच शिवप्रेमी युवक-युवती मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले.

हा सोहळा किल्ले धर्मवीरगडावरून रायगडावर जाणारा पहिलाच ऐतिहासिक उपक्रम ठरत असून त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पालखी पोहोचल्यावर मोठ्या उत्साहात धर्मवीरांना अभिवादन करण्यात येणार आहे.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी या ऐतिहासिक उपक्रमास शुभेच्छा देत तरुणांनी इतिहासाची जाण ठेवून स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा जपावी, असे आवाहन केले.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराने सातत्याने गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी, इतिहास जागवण्यासाठी आणि युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी घेतलेले हे उपक्रम प्रेरणादायी ठरत आहेत. धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मृतींचा हा जागर इतिहासप्रेमींसाठी ऊर्जा देणारा आणि स्वराज्याच्या विचारांना नवचैतन्य देणारा ठरला आहे.

धर्म, शौर्य आणि स्वाभिमान यांची परंपरा जपणाऱ्या या पालखी सोहळ्यामुळे इतिहास केवळ पुस्तकांत न राहता प्रत्यक्ष कृतीतून जिवंत ठेवण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.