श्रीक्षेत्र कोंभळी येथे पायी दिंडी सोहळ्याचा भक्तीमय जल्लोष…..

कोंभळी |दि . ०२ मार्च २०२६

गणेश कविटकर

 

ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली २७ वे वर्ष

 

कोंभळी : अखंड हरिनामाच्या गजरात आणि नाथांच्या जयघोषात कोंभळी नगरी पुन्हा एकदा भक्तीच्या सागरात न्हाऊन निघणार आहे. ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट, कोंभळी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी अशी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा यंदा २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या दिंडीमध्ये परिसरातील शेकडो वारकरी, महिला, युवक-युवती आणि ज्येष्ठ भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. गुरुवार, दि. ५ मार्च ते सोमवार, दि. ९ मार्च २०२६ या कालावधीत हा भक्तिमय प्रवास पार पडणार आहे.

दिंडीची सुरुवात अभिषेक व मंदिरातील पूजाविधीने होणार असून, गाव प्रदक्षिणेनंतर टाळ-मृदुंगाच्या नादात वारकरी पुढील प्रवासास प्रस्थान करतील. मार्गात विविध ठिकाणी महाप्रसाद, भजन-कीर्तन, हरिपाठ आणि हरीकथा यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मुक्कामस्थळी दिंडीचे जल्लोषात स्वागत होणार असून, भाविकांच्या सेवाभावामुळे वातावरण अधिकच मंगलमय होणार आहे.

शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत विविध गावांतून दिंडीचा प्रवास होऊन शेवटी श्री क्षेत्र मढी येथे महाल प्रदक्षिणा व समारोप सोहळा पार पडणार आहे. शेवटच्या दिवशी पहाटे महाल प्रदक्षिणा करून दिंडीचा भक्तिमय समारोप करण्यात येईल.

दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्टच्या वतीने भोजन, निवास तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. “भक्ती हीच खरी शक्ती” या भावनेतून सर्वांनी शिस्त, स्वच्छता आणि भक्तिभाव राखावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गेल्या २७ वर्षांची परंपरा जपत, श्रद्धा आणि समर्पणाचा वारसा पुढे नेत ही पायी दिंडी केवळ प्रवास नसून, तो आत्मशुद्धीचा आणि एकात्मतेचा सोहळा ठरत आहे. ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या ओजस्वी मार्गदर्शनामुळे या दिंडीला अध्यात्मिक अधिष्ठान लाभले असून, कोंभळी नगरी पुन्हा एकदा हरिनामाच्या गजराने दुमदुमणार आहे.