तलावांमधील पाणी उपशावरील बंदी उठवा; शेतीचा वीजपुरवठाही तातडीने सुरू करा
शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; दोन दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
श्रीगोंदा | दि. २८ सप्टेंबर २०२६
गणेश कविटकर
एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी हैराण, तर दुसरीकडे तलावांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही शेतीसाठी पाणी उपशावर बंदी आणि वीजपुरवठा खंडित. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास धोक्यात आला असून, ‘पाणी असताना शेतीला पाणीबंदी का?’ असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नावर २८ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले.
विसापूर, मोहरवाडी, घोठवी, पारगाव, घोडेगाव, देऊळगाव, औटीवाडी यांसह विविध तलावांमध्ये पाणी उपलब्ध असताना त्याचा शेतीसाठी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यातच संबंधित भागातील शेतीचा वीजपुरवठाही बंद असल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गंभीर झाले आहे. त्यामुळे तलावांमधील उपलब्ध पाणी शेतीसाठी वापरण्यास परवानगी द्यावी, पाणी उपशावरील बंदी तातडीने उठवावी आणि शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दुष्काळामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना उपलब्ध पाणी शेतीसाठी वापरण्यास बंदी घालणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दोन दिवस प्रतीक्षा करू; मात्र या कालावधीत सकारात्मक निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
माजी जि.प. सदस्य हेमंत नलगे यांनीही प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. निर्णय लांबला तर शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवू शकते, असे त्यांनी सांगितले.
हरिदास शिर्के यांनी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगत असताना प्रत्यक्षात पाणी उपसा बंद होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे नमूद केले. तर प्रशांत दरेकर यांनी धरणे व तलावांमध्ये पाणी उपलब्ध असताना शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याबाबत प्रश्न उपस्थित करत उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांचे बैठकीचे आश्वासन
शेतकऱ्यांच्या निवेदनानंतर जिल्हाधिकारी पंकजा अषिया यांनी जलसंपदा विभाग आणि महावितरण विभागासोबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी दोन दिवस प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, या कालावधीत मागण्यांवर निर्णय न झाल्यास राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी राजेंद्र म्हस्के, हेमंत नलगे, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, भाऊसाहेब नेटके, बाळासाहेब नलगे, विश्वास थोरात, अमित लगड, भूषण बडवे, सुभाष लगड, माऊली मोटे, बापूसाहेब चिखलठाणे, मच्छिंद्र नलगे, एकनाथ बारगुजे, महादेव म्हस्के, ज्ञानेश्वर खेतमाळीस, शिरसाट मेजर, सौ. प्रतिभा धस, प्रमोद म्हस्के यांच्यासह विसापूर, कोळगाव, पारगाव, घारगाव परिसरातील तसेच श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
