गतहंगामातील उसाला प्रतिटन ३१०० रुपये अदा; दिवाळीपूर्वी २०० रुपयांची अतिरिक्त रक्कम आणि दिवाळीत मोफत साखर देण्याची बाबुराव बोत्रेपाटील यांची घोषणा
श्रीगोंदा | दि. 25 ऑक्टोबर 2026
गणेश कविटकर
हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने गत गाळप हंगामात गाळप झालेल्या उसासाठी प्रतिटन ३१०० रुपये अदा केले असून, दिवाळीपूर्वी प्रतिटन २०० रुपये अतिरिक्त रक्कम देण्यासह दिवाळीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर देण्यात येणार आहे. यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे आठव्या दिवशी थेट बँक खात्यात जमा केले जातील, अशी ग्वाही ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली.
हिरडगाव येथील गौरी शुगरच्या चौथ्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व गाळप हंगामाचा शुभारंभ कारखान्याच्या संचालक रेखा बोत्रेपाटील आणि ओमराजे बोत्रेपाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोत्रेपाटील बोलत होते.
बोत्रेपाटील म्हणाले, की ओंकार शुगर ग्रुपने ३५ साखर कारखाने चालविण्यापर्यंत मजल मारली असून, साखर उद्योगात समूहाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. शेतकऱ्यांकडून शेअर्सपोटी एक रुपयाही घेतलेला नाही, तसेच शासनाच्या कोणत्याही सवलतीशिवाय उद्योग उभा केला आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीतील घटकांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन बोलावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन आणि गाळप कमी होण्याची शक्यता आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही अहिल्यानगर जिल्ह्यातील गौरी शुगर ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहतूकदारांच्या हिताला प्राधान्य देणार आहे. ऊस पुरवठ्यानंतर आठव्या दिवशी पैसे खात्यावर जमा करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नियोजन करणे सोयीचे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण फराटे यांनी केले. यावेळी टिळक भोस आणि नवनाथ शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कारखान्याच्या संचालक रेखा बोत्रेपाटील, ओमराजे बोत्रेपाटील, उद्योग समूहाच्या सीईओ तेजस्विनी बर्गे, सचिन चौधरी, संतोष दरेकर, कुंडलिक बनकर, भूषण बडवे, सरव्यवस्थापक वसंत जरमळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर आभार नवनाथ दरेकर यांनी मानले.
