केमिकलपासून बनावट दूध निर्मितीचा भंडाफोड; १७.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त….

लहान मुलं व वृद्धांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची जनतेची मागणी……

 

नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या बनावट दूध निर्मिती रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाईत पर्दाफाश केला आहे. जामखेड पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या एका दूध संकलन केंद्रावर छापा टाकून तब्बल १७,३२,८९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी व त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई पार पाडली. केमिकलच्या साहाय्याने दूध तयार करून ते विविध भागांत विक्रीसाठी पाठवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान दूध निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे १११८ लिटर पॅराफिन ऑइल, ३०० किलो पांढरी पावडर, ३२० लिटर केमिकलयुक्त तयार दूध, मोठ्या प्रमाणात पॅकिंग साहित्य तसेच दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली. सहा ड्रममधील घातक रसायनांपासून मोठ्या प्रमाणावर बनावट दूध तयार होत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नमुने तपासणीसाठी पाठवले असून प्राथमिक निष्कर्षांनुसार हे दूध मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे समोर आले आहे. विशेषतः लहान मुलांच्या वाढीवर, रोगप्रतिकारक शक्तीवर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचे गंभीर व दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, “नफ्यासाठी निष्पाप बालकांच्या आणि वृद्धांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कोणतीही माफी नसावी,” अशी तीव्र भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकाराकडे केवळ गुन्हा म्हणून नव्हे, तर समाजाच्या आरोग्यावर झालेला घात मानून अत्यंत कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

जिल्ह्यात बनावट अन्नपदार्थांविरोधात व्यापक मोहीम राबवून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच अशा रॅकेटचा पूर्णपणे बीमोड करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.