नागवडे साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी सौ. मेघा औटी यांची एकमताने निवड

श्रीगोंदा | दि. २३ जानेवारी

गणेश कविटकर

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात इतिहासात प्रथमच महिलेला संधी…

 

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त असलेल्या व्हाईस चेअरमन पदावर सौ. मेघा संदीपराव औटी यांची एकमताने निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि कारखान्याच्या ५१ व्या ऐतिहासिक गळीत हंगामात प्रथमच एका महिलेला व्हाईस चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहिल्यानगर तथा अध्यासी अधिकारी संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, ता. २३ रोजी सकाळी ११ वाजता कारखान्याच्या अतिथीगृहात संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली.

यानंतर व्हा. चेअरमन पदासाठी संचालिका सौ. मंदाकिनी मारुती पाचपुते यांनी सौ. मेघा औटी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्यास संचालक सावता लक्ष्मण हिरवे यांनी अनुमोदन दिले. इतर कोणताही पर्यायी प्रस्ताव न आल्याने सौ. औटी यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे म्हणाले की, “केंद्र शासनाने चालू वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर कारखान्याचा ५१ वा गळीत हंगाम सुरू आहे. या ऐतिहासिक क्षणी महिलांना नेतृत्वाची संधी द्यावी, या सकारात्मक भूमिकेतून सर्व संचालकांनी एकमताने सौ. मेघा औटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.”

सौ. मेघा औटी या गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून वेळू गावच्या सरपंचपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वाचा लाभ कारखान्याच्या प्रगतीस निश्चितच होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. स्व. बापूंच्या विचारांवर चालणारी कारखान्याची विकासाची वाटचाल भविष्यातही अधिक सक्षमपणे पुढे जाईल, असेही नागवडे यांनी सांगितले.

या सभेस कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, अधिकारी, कर्मचारी, सभासद व खातेप्रमुख उपस्थित होते.

सौ. मेघा औटी यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, संचालक मंडळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, तालुका दूध संघाचे चेअरमन दिलीप वागस्कर यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.