राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोनिया गांधी पॉलिटेकनिक कॉलेजमध्ये प्रभावी मतदार जनजागृती कार्यक्रम….

श्रीगोंदा | दि. २३ जानेवारी २०२६

गणेश कविटकर

 

लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन करत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शहरातील सोनिया गांधी पॉलिटेकनिक कॉलेज येथे भव्य मतदार जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाने आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदानाचा हक्क बजावावा, तसेच लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागी व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मतदान हे केवळ हक्क नसून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदानाची टक्केवारी घटणे हे लोकशाहीसाठी धोक्याचे लक्षण आहे. मतदान हा सण मानून तो आनंदाने साजरा केला पाहिजे.” प्रत्येक मत लोकशाहीची ताकद वाढवते, असे त्यांनी स्पष्ट केले.

तहसीलदार सचिन डोंगरे यांनी आपल्या भाषणात भारतातील लोकशाही परंपरेचा आढावा घेत सांगितले की, “१९५२ साली भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि एका मताचे महत्त्व प्रत्येक उमेदवाराला माहीत असते.” भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून, पूर्वी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान होत असे, तर आता ईव्हीएममुळे प्रक्रिया अधिक सोपी व पारदर्शक झाली आहे. त्यामुळे तरुणांनी जिथे असतील तिथे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल नागावडे, कॉलेज निरीक्षक गोलांडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनारसे सर यांनी केले, प्रास्ताविक पंडित गायकवाड सर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन विलास शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मार्गदर्शनामुळे भविष्यात मतदान करताना अधिक जागरूक व जबाबदार नागरिक म्हणून सहभाग नोंदवू, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.