श्रीगोंदा | दि. १९ जानेवारी २०२६
गणेश कविटकर
श्रीगोंदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नवनिर्वाचित झालेल्या अलका अनभुले यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या साध्या मात्र उत्साहपूर्ण कार्यक्रमात त्यांनी पदभार स्वीकारत श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना अलका अनभुले म्हणाल्या की, शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, नागरी सुविधा तसेच महिलांसाठीच्या विकासात्मक योजनांना प्राधान्य देण्यात येईल. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभार करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, ज्येष्ठ नेते पोपट आबा खेतमाळीस, विधीतज्ज्ञ अॅड. जे. डी. अनभुले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप नागवडे, राजेंद्र उखांडे यांच्यासह आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी अलका अनभुले यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. अनुभव, नेतृत्व आणि लोकसंपर्काच्या जोरावर श्रीगोंदा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
