चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट कोंभळी यांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न….

कोंभळी | १८ जानेवारी २०२६

गणेश कविटकर

 

श्री चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट, कोंभळी यांच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा तसेच श्रीगोंदा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा भव्य सत्कार सोहळा आज रोजी रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी कोंभळी येथे अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमास ह. भ. प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती म्हणून श्री प्रशांत दादा जगताप,श्री सोपान उर्फ काका चव्हाण,श्री संदीप बेलदरे पाटील,श्री भरत भूषण बराटे, श्री प्रशांत उर्फ मामा तुपे, सौ. सीमाताई सुधीर कोंढरे तसेच श्रीगोंदा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मिराताई शिंदे यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना ह. भ. प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांनी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांना जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरत सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख कार्य करण्याचा संदेश दिला. “सत्ता ही सेवा करण्यासाठी असते, समाजाच्या सर्वसामान्य घटकांपर्यंत विकास पोहोचविण्याचे पवित्र कार्य तुमच्याकडून घडो,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले. तसेच पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

या प्रसंगी ट्रस्टचे पदाधिकारी, सभासद, गुरुबंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक ऐक्य, सद्भावना व लोकशाही मूल्यांचा सन्मान जपणारा हा सत्कार सोहळा उपस्थितांच्या मनावर प्रेरणादायी ठसा उमटवून गेला.