श्रीगोंदा | दि. १६ जानेवारी २०२६
गणेश कविटकर
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती श्रीगोंदा सन २०२६ च्या नियोजनासाठी आज श्रीगोंदा येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सौ. मीराताई खेडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी उपाध्यक्षपदी चेतना मांगडे यांची निवड करण्यात आली. तसेच खजिनदारपदी बाळूदादा मखरे, तर सचिवपदी श्री. सुनील ढवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे आगामी शिवजयंती उत्सव अधिक उत्साहात, शिस्तबद्ध व समाजप्रबोधनात्मक पद्धतीने साजरा होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या बैठकीस अरविंदजी कापसे, श्यामभाऊ झरे, दिलीपजी लबडे, नानासाहेब शिंदे, बाळूदादा मखरे, दीपक मखरे, नगरसेवक सोनूदादा कोथंबिरे, नगरसेवक बाबुशेठ धुमाळ, नगरसेवक अनिल महाराज औटी, सतीश सर मखरे, अजिजभाई शेख, सुनीलजी ढवळे, श्री. पारे यांच्यासह अनेक मान्यवर व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य व इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवजयंती उत्सव सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक जाण जपणारा असावा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
बैठकीच्या शेवटी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६ श्रीगोंदा येथे भव्य व प्रेरणादायी स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
