धर्मवीरगडावर तिरंगा डौलाने फडकला; स्वातंत्र्यदिनाचा देशभक्तीचा जागर

श्रीगोंदा : दि. १५ ऑगस्ट २०२६

गणेश कविटकर

 

छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगडावर भारताचा तिरंगा डौलाने फडकला आणि स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभक्तीच्या उत्साहात साजरा झाला. ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रप्रेम यांचा अनोखा संगम घडविणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना जागवली.

राज्य पुरातत्त्व विभाग, नाशिक तसेच श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे व नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या नियोजनातून किल्ले धर्मवीरगडावर शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. पेडगावचे ग्राममहसूल अधिकारी राहुल वडमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या गौरवशाली सोहळ्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा फडकविण्याचे भाग्य श्रीगोंदकरांना लाभणे ही केवळ अभिमानाची बाब नसून इतिहास, राष्ट्रप्रेम आणि कर्तव्याची जाणीव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारी प्रेरणादायी परंपरा आहे.

सोहळ्यास पेडगावचे सरपंच इरफान पीरजादे, युवराज शिंदे, अशोक गोधडे, गोरख खेडकर, संतोष बंदिस्ती, कैलास गवईकर, सादिक इनामदार, पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी मच्छिंद्र पंडित, प्राथमिक शिक्षक विजय लंके यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

 

ध्वजारोहणापूर्वी गडाची स्वच्छता

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या शिलेदार मावळ्यांनी धर्मवीरगडावर श्रमदान मोहीम राबविली. ध्वजस्तंभाच्या परिसरातील वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यापूर्वी ऐतिहासिक गडाची स्वच्छता करून त्याचा सन्मान करण्याचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे स्वयंसेवक तथा शिलेदार मावळे अमोल बडे, सचिन भोसले, ईश्वर कोठारे, आविष्कार इंगळे व अनिकेत कोठारे यांनी सोहळ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन केले.

गेल्या पाच वर्षांपासून राज्य पुरातत्त्व विभाग, नाशिक, केंद्रीय पुरातत्त्व विभाग, अहिल्यानगर आणि तहसील कार्यालय, श्रीगोंदा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनकडून धर्मवीरगडावर स्वातंत्र्यदिनाचा हा गौरवशाली सोहळा सातत्याने आयोजित केला जात आहे.

इतिहास केवळ पुस्तकात जपायचा नसतो, तर तो आपल्या कृतीतून पुढे न्यायचा असतो. धर्मवीरगडावर फडकणारा तिरंगा ही त्याच जाज्वल्य राष्ट्रभावनेची साक्ष आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यभूमीवर उमटलेला हा तिरंगा प्रत्येक भारतीयाला राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि देशसेवेची प्रेरणा देत राहील.