पानिपत वीरांचा वारसा संवर्धनासाठी ‘शिवदुर्ग’ची सह्यांची मोहिम… कलावंतीण दुर्गावरून वारसा स्मारकासाठी शिवदुर्ग ट्रेकर्सचा पुढाकार……

         श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा ही पानिपत वीरांची भूमी, शौर्य आणि शिंदेशाही परंपरेचा वारसा लाभलेली धरती! मात्र हा ऐतिहासिक वारसा आज अत्यंत विदारक अवस्थेत आहे. शहरातील राजवाडे, वेशी, समाधीस्थळे, बारवा ही स्मारके मोडकळीस आलेली असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या वारशाचे संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी त्याचे जतन करण्याच्या उद्देशाने ‘शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन’ संचलित ‘शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती’ ने एक आगळीवेगळी ‘सह्यांची मोहीम’ हाती घेतली आहे.

               ही मोहीम महाराष्ट्रातील सह्याद्रीतील अत्यंत कठीण आणि उंच अशा कलावंतीण दुर्ग सुळक्यावरून सुरू करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मानवंदना देत ‘पानिपत वीरांचा वारसा संवर्धनासाठी सही’ करण्याची मोहिम राबविण्यात आली.

            ९५ वी ट्रेकिंग मोहीम म्हणून आयोजित या उपक्रमात ५२ सदस्यांनी सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील कलावंतीण दुर्ग व प्रबळगडावर चढाई करताना या मोहिमेचा भाग म्हणून ७५ वी प्लास्टिक स्वच्छता मोहीम प्रबळमाची येथे पार पडली. या सर्वांनी ‘वारसा जतन करण्याचा’ निर्धार व्यक्त करत आपल्या सह्या करून सहभाग नोंदवला.

            श्रीगोंद्यातील पानिपत वीरांचा वारसा दररोज ढासळत चालला आहे. नागरिकांमध्ये या वारशाबाबत असणारी उदासीनता दूर करण्यासाठी ‘शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन’ने ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. संस्थेच्या सदस्यांनी सह्याद्रीच्या उंच शिखरावर पोहोचून ‘सही करा, वारसा वाचवा’ असा संदेश देत प्रतीकात्मक उपक्रम केला.

             या उपक्रमाबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे म्हणाले,“श्रीगोंदा ही पानिपत वीरांची भूमी आहे. हा वारसा पुढील पिढीसाठी जपणे हे आपले कर्तव्य आहे. करोडो रुपये खर्च करूनही आपण हा इतिहास पुन्हा उभा करू शकत नाही. म्हणूनच आम्हाला पैशांची नाही, तर प्रत्येक नागरिकाची एक सही हवी आहे. या सही मोहिमेची माहिती आम्ही लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सादर करून ‘पानिपत वीर वारसा संवर्धन’ यासाठी विनंती करणार आहोत.”