
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधत जि.प. प्राथमिक शाळा बाबुर्डी येथे यंदाचा बालदिन अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. इन्फोसिसच्या “Springboard Maker Lab on Wheels” या आधुनिक AI जनरेटेड चल प्रयोगशाळेची बस आज शाळेत दाखल झाली व विद्यार्थ्यांना विविध तंत्रज्ञान प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
https://youtu.be/sCcQps89BsUsi=1xfcZ_TgNpGef6jb
आधुनिक तंत्रज्ञान, AI आधारित प्रयोग, रोबोटिक्स, डिजिटल मॉडेल्स यांचा समावेश असलेल्या या प्रयोगशाळेने विद्यार्थ्यांना अगदी प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. अचानक मिळालेल्या या भव्य व उपयुक्त भेटीमुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. बालदिनाचे औचित्य अधिक संस्मरणीय करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
शब्द दिल्यानंतर केवळ तीन दिवसांतच इन्फोसिसची बस शाळेत पोहोचवून दिल्याबद्दल मा. श्री. रमेश कासार साहेब, सहाय्यक संचालक, लोकल फंड, अहिल्या नगर यांचे शाळा व्यवस्थापन समिती, बाबुर्डी यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. शाळा परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण असून, शिक्षक व पालकांनीही या अभिनव प्रयोगशाळेचे कौतुक केले. बालदिन अविस्मरणीय करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला.