अहिल्यानगर | दि. १० जानेवारी २०२६
गणेश कविटकर
व्यंकटेश पोद्दार लर्न स्कूलची गुणवंत विद्यार्थिनी कु. वेदश्री मिनीनाथ ढवळे हिने २०२६ मध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. रंगोत्सव व कराटे या दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवणारी वेदश्री ही अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली असून तिच्या या नेत्रदीपक यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कराटे स्पर्धेत यापूर्वीही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेदश्रीने सातत्य, मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या विजयाची बातमी सोशल मीडियावर प्रसारित होताच राजकीय, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.
दि. ७ जानेवारी रोजी अहिल्यानगर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेदश्रीचा विशेष सत्कार करून तिचे अभिनंदन केले. यावेळी मा.खासदार डॉ. सुजय दादा विखे, आमदार संग्राम भैय्या जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन दिनकर, मा. दिलीप भालसिंग यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
वेदश्रीच्या यशाबद्दल बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले,“कराटे स्पर्धेमध्ये वेदश्रीने केलेली शानदार कामगिरी अभिमानास्पद आहे. तिच्या सुवर्णपदकामुळे संपूर्ण जिल्हा आनंदी आहे. तिने आपल्या कौशल्याने आणि जिद्दीने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.”
याचवेळी वेदश्रीच्या यशामागे मोलाचा वाटा उचलणारे व्यंकटेश पोद्दार लर्न स्कूलचे मुख्याध्यापक मा. आनंद शहा सर, क्रीडा शिक्षक बाबू बळे सर, जयेश आनंदकर सर व सिद्धेश आनंदकर सर यांचेही पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. “योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचे हे सुंदर फळ आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
वेदश्रीच्या या दैदीप्यमान यशामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
