श्रीगोंदा | दि. 16 जून 2026
गणेश कविटकर
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व शर्तींमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत श्रीगोंदा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी तालुक्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला.
शेतकरी नेते राजेंद्र (आबा) म्हस्के यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून सरसकट कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.
बैठकीत शेतकरी हितासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या १९ जून २०२६ रोजी कोळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून २२ जून रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर भव्य निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, अनिल घनवट, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, अनिल ठवाळ, मारुती भापकर, श्रीनिवास नाईक, हेमंत नलगे, राजेंद्र नागवडे, मुकुंद सोनटक्के, शामराव नागवडे, माऊली मोटे, भास्कर वागस्कर, नितीन डुबल, भाऊसाहेब नेटके, अशोक नवले, रघुनाथ सूर्यवंशी, वसंत जामदार, राजेंद्र इधाते, महादेव म्हस्के, अनिल भुजबळ, दिलीप कर्डिले यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू झालेल्या या लढ्याला तालुकाभरातून पाठिंबा मिळत असून शासनाने तातडीने सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
