जप्त गुटख्याचाच सीआर नंबर पुन्हा सापडल्याने खळबळ; चौकशीचे आदेश

श्रीगोंदा | दि. 16 जून 2026

गणेश कविटकर

स्थानिक गुन्हे शाखेने अलीकडेच केलेल्या गुटखा जप्तीच्या कारवाईत एक धक्कादायक बाब समोर आली असून, जप्त करण्यात आलेल्या गुटख्याच्या गोण्यांवर आढळलेला सीआर क्रमांक ४६३/२०२६ हा यापूर्वी पोलिसांनीच जप्त केलेल्या गुटखा प्रकरणातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल पुन्हा बाजारात कसा पोहोचला, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

१५ मे रोजी बेलवंडी पोलिस पथकाने श्रीगोंदा शहर व परिसरात कारवाई करून सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६३/२०२६ दाखल करण्यात आला होता. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता.

दरम्यान, १४ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या स्वतंत्र कारवाईत ३ लाख ७२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या वेळी ज्या गोण्यांमध्ये गुटखा साठवण्यात आला होता, त्यावर ४६३/२०२६ हा सांकेतिक क्रमांक आढळून आला. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल पुन्हा विक्रेत्यांपर्यंत पोहोचल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांकडून अहवाल मागविला आहे. प्राथमिक अहवालानंतर संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेनंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिवसभर अस्वस्थ वातावरण पाहायला मिळाले. वरिष्ठ स्तरावर चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याने अधिकाऱ्यांनी याबाबत भाष्य करण्याचे टाळले.

मुद्देमाल बाहेर गेला कसा?

कायद्याच्या ताब्यात असलेला आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी जतन करून ठेवलेला मुद्देमाल पुन्हा बाजारात आढळणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे संबंधित यंत्रणेतील निष्काळजीपणा, संगनमत किंवा व्यवस्थेतील त्रुटी याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही सर्वसामान्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जनतेत संतापाची लाट

घटनेची माहिती माध्यमांमधून समोर आल्यानंतर तालुक्यात संतापाची भावना व्यक्त होत आहे. “पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमालच सुरक्षित नसेल, तर कायद्यावरील विश्वास कसा टिकणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारी मुद्देमालाच्या सुरक्षेची जबाबदारी असताना कर्तव्यात कसूर झाल्याचा आरोप करत, संबंधितांवर चोरी व संगनमताचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याच्या पोलिस महासंचालकांनाही निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांच्या ताब्यातील जप्त गुटखा पुन्हा बाजारात पोहोचला तरी कसा? या प्रश्नाचे उत्तर चौकशीतून मिळणे आवश्यक असून, दोषींवर कठोर कारवाई झाल्यासच जनतेचा कायदा व यंत्रणेवरील विश्वास अबाधित राहू शकेल.