श्रीगोंदा | दि. 25 एप्रिल 2026
गणेश कविटकर
समाजात दातृत्वाची भावना रुजवून वंचितांना आधार देण्याचा सुंदर संदेश देणारा “एक मुठ धान्य अनाथांसाठी” हा उपक्रम अग्नीपंख फौंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत पार पडला. या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी उपस्थितांना संबोधित करताना हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली.
स्व. अजित पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, सामान्य माणसांच्या समस्यांची जाणीव ठेवून समाजहिताचा ध्यास घेणाऱ्या या उपक्रमाला त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “अनाथ मुलांसाठी एक मुठ धान्य देणे ही केवळ मदत नसून, ती संवेदनशील समाज घडवण्याची पायाभरणी आहे. हा उपक्रम शाळा स्तरावर राबवून मुलांमध्ये दातृत्वाची भावना रुजवणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन भंडारी यांनी केले.
गुरुवारी आयोजित या सोहळ्यात ७२ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवून दिली. या शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सर्व शाळांना उपयुक्त भेटवस्तू देण्यात आल्या, तर दहा शाळांना सन्मानपत्र आणि सायकली प्रदान करून त्यांचे गौरव करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब वाघ होते. यावेळी प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी अग्नीपंख फौंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, “शिक्षणासोबतच सामाजिक परिवर्तनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे,” असे मत व्यक्त केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनीही शिवरायांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करत, ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
उद्योजक संजयकुमार मचे, प्रविण शिंदे, रामदास झेंडे, डी. डी. भुजबळ, विकास पाटील, आबासाहेब जगताप यांनीही आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक केले. अग्नीपंख फौंडेशनचे विश्वस्त दिलीपराव काटे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली.
या कार्यक्रमास तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी, संदीप सोमवंशी, किसन वऱ्हाडे, एन. टी. शेलार, अंकुश घाडगे, गोपाळराव डांगे, भावना मोहीते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार इथापे यांनी मानले.
“एक मुठ धान्य” या साध्या संकल्पनेतून उभी राहणारी माणुसकीची भक्कम भिंत समाजाला नव्या दिशेने नेणारी आहे. अग्नीपंख फौंडेशनचा हा उपक्रम केवळ मदतीचा नाही, तर संवेदनशील आणि सजग पिढी घडवण्याचा प्रेरणादायी प्रयत्न ठरत आहे.
