श्रीगोंदा | दि. ०८ जानेवारी २०२६
गणेश कविटकर
महिला सक्षमीकरण व शेतकरी हिताच्या कार्याने बिहारची अभ्यास समिती भारावली…
सहकारी चळवळीत माणुसकी, निःस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपली गेली, तर तिचे परिणाम किती व्यापक असू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्रीगोंदा येथील वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि चैतन्य उपक्रम होत. सहकारी मित्राला आजारपणात उपचारासाठी आर्थिक मदत न मिळाल्याने गमवावे लागले, या वेदनेतून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो महिला, शेतकरी आणि लघुउद्योजकांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पसरवत आहे.
गेल्या दहा वर्षांत महिला सक्षमीकरण, शेतकरी हित आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांनी बिहार राज्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यास समितीला विशेष प्रभावित केले. “महाराष्ट्रातील हे सहकारी मॉडेल बिहारसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे गौरवोद्गार बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या अभ्यास समितीचे सदस्य कपिलदेव शर्मा यांनी काढले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) पुणे येथील सहाय्यक प्राध्यापक प्रा. ऋषिकेश कळमकर यांच्या नेतृत्वाखाली बिहार राज्यातील विविध सहकारी संस्थांचे ९ अध्यक्ष मंगळवारी श्रीगोंदा दौऱ्यावर आले होते. या अभ्यास दौऱ्यात त्यांनी श्रीगोंदा येथील वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी, पारगाव फाटा येथील चैतन्य बाजार समिती तसेच अहिल्यानगर येथील चैतन्य महिला बचत गटांच्या उपक्रमांचा सखोल अभ्यास केला.
यावेळी बोलताना कपिलदेव शर्मा म्हणाले, “बिहारमध्ये सहकारातून महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र महाराष्ट्राने या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. वृध्देश्वर अर्बन व चैतन्य उपक्रम हे सहकाराचे आदर्श मॉडेल असून, संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी निःस्वार्थ भावनेतून उभारलेले हे कार्य आम्ही बिहारमध्ये मार्गदर्शक ठरवणार आहोत.”
प्रा. ऋषिकेश कळमकर यांनी वृध्देश्वर अर्बन सोसायटीच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करताना, “नाशिकसारख्या अग्रगण्य सहकारी संस्थांच्या धर्तीवर उभे राहिलेले हे काम अल्पावधीत महिला व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते,” असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, सौ. सायली वाडगे व सौ. मेघना गावडे यांनी महिला बचत गटांची उभारणी, महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण, आदिवासी मच्छीमार समाजासाठी राबविलेल्या योजना, गृहउद्योगातून निर्माण झालेली आर्थिक समृद्धी तसेच कर्जवसुलीची शिस्तबद्ध कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली.
अभ्यास समितीने चैतन्य बाजार समितीला भेट देऊन शुभम वाडगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी मालाचे अचूक वजन, पारदर्शक लिलाव प्रक्रिया, लिलावानंतर तातडीने शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम तसेच महानगरांच्या धर्तीवर होणाऱ्या बोली व्यवस्थेची माहिती घेण्यात आली. अहिल्यानगर येथील महिलांसाठी सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्ग व विविध विकास योजनांचाही समितीने अभ्यास केला.
यावेळी शंतनु शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्लस्टर योजनेंतर्गत प्रस्तावित फ्लोअर मिल व डाळ मिल प्रकल्पांची माहिती दिली.
या सर्व उपक्रमांचा अभ्यास करताना आम्ही भारावून गेलो असून, “या मॉडेलचा बिहारमधील सहकार संस्थांमध्ये प्रसार करून महिला बचत गट व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी निश्चित प्रयत्न करू,” असा ठाम निर्धार अभ्यास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला.
बिहारच्या पॅक्स समितीत कपिलदेव शर्मा, किशोर कुमार, मोहम्मद शाहीद आलम, श्रीकृष्ण मेनन, संजय कुमार, जवाहर कुमार सिंह, अमित कुमार, राजेश कुमार सिंह व प्रभात रंजन बिस्वास यांचा समावेश असून ही समिती ५ ते ९ जानेवारीदरम्यान महाराष्ट्रातील विविध सहकारी संस्थांचा अभ्यास दौरा करीत आहे. या भेटीप्रसंगी सौ. रुक्मिणीताई वाडगे, अनिल गावडे, संचालक मंडळाचे सदस्य तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
