श्रीगोंदा नगर परिषद हद्दीतील विकास प्रकल्पांबाबत प्रशासकीय समन्वयातून सविस्तर बैठक

श्रीगोंदा | दि. ०६ जानेवारी २०२६

गणेश कविटकर, श्रीगोंदा.

 

श्रीगोंदा नगर परिषद हद्दीतील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहराचा सुव्यवस्थित, नियोजित व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने सर्व विकासक व जमीन मालकांची प्रशासकीय पातळीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. इमारत परवाना मंजुरी प्रक्रिया अधिक पारदर्शक व वेळबद्ध करण्यासह व्हॉलंटरी टाउन प्लॅनिंग स्कीम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.

सदर बैठक आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या उपस्थितीत तसेच नगर परिषदेचे संबंधित अधिकारी व प्रशासकीय यंत्रणेच्या सहभागाने पार पडली. यावेळी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या दीर्घकालीन विकास आराखड्याची माहिती देत इमारत परवाना मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे, परवानगी प्रक्रियेचा कालावधी, लागू नियम व अटी तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास करण्यात येणाऱ्या प्रशासकीय कारवाईबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

व्हॉलंटरी टाउन प्लॅनिंग स्कीमअंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था व अन्य नागरी सुविधा विकसित करण्याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. या योजनांमुळे शहराचा सुरक्षित, सुव्यवस्थित व शाश्वत विकास साधण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी विकासक व जमीन मालकांनी मांडलेल्या विविध अडचणी, सूचना व प्रश्नांवर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर खुलासे करत मार्गदर्शन केले. इमारत परवाना प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळबद्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, तसेच नियमबाह्य बांधकामांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

शहराचा नियोजित व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी विकासक, जमीन मालक व प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यावश्यक असून नगर परिषद सर्व घटकांशी सातत्याने संवाद साधत नियमानुसार कार्यवाही करेल, असे यावेळी नमूद करण्यात आले.

या बैठकीस नगरपालिका मुख्याधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी, नगराध्यक्षा श्रीमती सुनीताताई संतोष खेतमाळीस, नगरसेवक तसेच श्रीगोंदा शहरातील सर्व विकासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण व नियोजनबद्ध विकासासाठी प्रशासन व विकासकांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.