ऑपरेशन मुस्कान अंतर्गत श्रीगोंदा पोलिसांची यशस्वी कामगिरी; पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली अल्पवयीन मुलीचा मुंबईतून शोध

श्रीगोंदा | दि. 14 जून 2026

गणेश कविटकर

 

श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली श्रीगोंदा पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या एका दिवसात मुंबई येथून शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. १० जून रोजी रात्री घरातून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा ठावठिकाणा लागत नसल्याने तिच्या पालकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तत्काळ तपास पथकाला सूचना देत शोधमोहीम सुरू केली.

तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या समन्वयातून मुलगी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दि. १२ जून रोजी मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षित ताब्यात घेतले आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालकांच्या स्वाधीन केले.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच दाखविलेली ही प्रभावी कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे. गुन्ह्यांचा तपास वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन गाडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव यांनी केला. तसेच अहिल्यानगर दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस हवालदार गुंडू व सांगळे यांनी तांत्रिक मदत केली.