श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, कारखान्याच्या अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक तसेच गौरी शुगर कारखान्यामुळे होणाऱ्या गंभीर प्रदूषणाच्या विरोधात आणि स्व. कुणाल दरेकर यांच्या अपघात मृत्यू प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थांनी हिरडगाव फाटा येथे तीव्र रास्तारोको आंदोलन केले.
शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, तरुण वर्ग व ग्रामस्थ सहभागी झाले होते. “हे रस्ते मृत्यूचे सापळे बनले असून प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान बोलताना शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले की, स्व. कुणाल दरेकर यांचा मृत्यू हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा व कारखान्याच्या मनमानीचा परिणाम आहे. या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. दहा दिवसांत तपास पूर्ण करून आरोपीस अटक न झाल्यास ग्रामस्थ पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करतील. तसेच कारखाना चालकांनी ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा कारखाना चालू दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, कारखान्याची अवजड वाहतूक थांबत नाही आणि प्रदूषणावर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली.गौरी शुगर कारखान्याच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान होत असून काळी राख पिकांवर साचत आहे. विहिरींचे पाणी दूषित झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशी तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात अंबादास दरेकर, प्रमोद म्हस्के, गंगाराम दरेकर, वामन भदे, शांताराम भुजबळ, रामदास बनकर, श्रीकांत ठवाळ यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाचे सूत्रसंचालन महादेव म्हस्के यांनी केले. यावेळी दादासाहेब बनकर, शशिकांत जगताप, राजेंद्र दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मात्र, गौरी शुगर कारखान्याचे अधिकारी व तहसीलदार आंदोलनस्थळी अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.पोलिस प्रशासनाच्या विनंतीनुसार स्व. कुणाल दरेकर यांना श्रद्धांजली वाहून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
