३१ मार्चपूर्वी कर्जफेड करा; कर्जमाफी योजनेचा लाभ घ्या – राजेंद्र नागवडे यांचे आवाहन

श्रीगोंदा | दि. 27 मार्च 2026

गणेश कविटकर

 

शेतकरी सभासदांनी आपल्या नावावर असलेली दीर्घ मुदत, मध्यम मुदत तसेच पशुपालन कर्जाची थकबाकी ३१ मार्चपूर्वी भरून शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागवडे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने कर्जदार शेतकरी सभासदांना दिलासा देण्यासाठी ही महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.

मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी आपली सर्व थकबाकी, त्यात दीर्घ मुदत, मध्यम मुदत तसेच पशुपालन कर्जाचा समावेश आहे, पूर्णपणे फेडणे अत्यावश्यक आहे. वेळेत कर्जफेड न केल्यास संबंधित शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच थकीत कर्जावर सध्या लागू असलेला १३ टक्के व्याजदर वाढून १५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. याउलट वेळेत कर्जफेड केल्यास जिल्हा सहकारी बँकांकडून पुढील कर्जपुरवठा सुलभ होणार असल्याचे नागवडे यांनी नमूद केले.

यामुळे सर्व कर्जदार शेतकरी सभासदांनी वेळ न दवडता आपल्या कर्जाची रक्कम भरणा करून शासनाच्या कर्जमाफी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे