श्रीगोंदा | दि. 31 मार्च 2026
गणेश कविटकर
श्रीगोंदा शहर व परिसरातील अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, वीज वितरणात अन्यायकारक पद्धत राबवली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी उपजिल्हा प्रमुख मनोहर पोटे, तालुका प्रमुख नंदकुमार ताडे, गटनेते बाबुशेठ धुमाळ यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरसेवक सुशीलकुमार शिंदे, नगरसेविका पल्लवी पोटे, अनिता औटी, नगरसेवक अनिल औटी, अख्तर शेख, दिपाली बोरुडे, ऋषिकेश बोरुडे, भामाबाई कोथिंबीरे, प्रतिक बोरकर, निलेश गोरे आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील वीज ग्राहकांकडून नियमित बिल आकारले जात असतानाही वीज पुरवठा मात्र ग्रामीण भागाच्या धर्तीवर दिला जात आहे. शेती पंपांच्या वेळापत्रकानुसार वीज दिली जात असल्याने व्यापारी, विद्यार्थी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा विपरीत परिणाम होत असून, रात्री-अपरात्री वीज पुरवठा सुरू केल्यामुळे अभ्यासासाठी योग्य वेळ मिळत नाही. याशिवाय छोटे व्यावसायिक, दुकानदार, दवाखाने व सेवा क्षेत्रांनाही या अनियमिततेचा फटका बसत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. शहराचा विस्तार वाढत असताना वीज वितरण व्यवस्थेत कोणतीही सुधारणा न झाल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.
श्रीगोंदा शहरासाठी स्वतंत्र व नियमित वीज पुरवठा तातडीने लागू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच येत्या सात दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित निवेदनाच्या प्रती श्रीगोंदा पोलीस ठाणे व प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रश्नावर नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या हक्काच्या वीज पुरवठ्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
