दि. 08 जून 2026
गणेश कविटकर
कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 4
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे चांदेबुद्रुक येथील प्राचीन खंडोबा मंदिरात आढळून आलेल्या मोडी लिपीतील शिलालेखाने मराठाकालीन धार्मिक आणि सामाजिक इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पैलू उजेडात आणला आहे. चांदे-मिरजगाव मार्गावरील या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कोरलेला चार ओळींचा हा शिलालेख अठराव्या शतकातील असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
वर्षानुवर्षे उघड्यावर राहिल्यामुळे शिलालेखावरील काही अक्षरे झिजली असली, तरी त्याचा छाप घेतल्यानंतर मजकूर स्पष्टपणे वाचता आला. मोडी लिपीतील या शिलालेखाचे वाचन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे –
“श्री
मार्तंडाचे सेवेस
भीव दिमत
लमाद निन”
या शिलालेखाचे संशोधन शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे राजेश इंगळे यांनी केले असून वाचन अनिल दुधाणे यांनी केले आहे.
भक्ती, सेवा आणि समर्पणाचा पुरावा
शिलालेखातील “श्री मार्तंडाचे सेवेस” हा उल्लेख तत्कालीन समाजातील मार्तंड-खंडोबा उपासनेचे महत्त्व अधोरेखित करतो. “भीव” किंवा “भिवाजी” नावाच्या व्यक्तीचा उल्लेख देवस्थानाशी संबंधित सेवक अथवा भक्त म्हणून आढळतो. “दिमत” हा शब्द फारशी भाषेतील ‘दिमती’ अर्थात सेवक, अनुयायी किंवा अधीनस्थ या अर्थाशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे मराठाकालीन धार्मिक जीवनात फारशी शब्दसंपदेचा झालेला प्रभावही या लेखातून दिसून येतो.
इतिहास अभ्यासकांच्या मते, हा शिलालेख केवळ एका भक्ताची नोंद नसून त्या काळातील धार्मिक श्रद्धा, देवसेवा, सामाजिक संबंध आणि सांस्कृतिक परंपरांचे जिवंत दस्तऐवजीकरण आहे. “मार्तंडाच्या सेवेत असलेला भिवाजी देवाच्या चरणी लीन आहे” असा या लेखाचा आशय असून, भक्तीभाव आणि समर्पणाची भावना त्यातून प्रकर्षाने जाणवते.
वारसा जतनाची गरज
अठराव्या शतकातील हा शिलालेख मराठाकालीन इतिहासाचा मौल्यवान पुरावा मानला जात आहे. अशा शिलालेखांमधून स्थानिक इतिहास, देवस्थान व्यवस्था, समाजरचना आणि भाषिक प्रभावांचा अभ्यास करण्यास महत्त्वपूर्ण मदत होते. त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे इतिहासप्रेमींनी मत व्यक्त केले आहे.
या शिलालेखाच्या शोध, छाप, माहिती संकलन व अभ्यासासाठी अनिल दुधाणे यांनी विशेष परिश्रम घेतले असून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे राजेश इंगळे, दिगंबर भुजबळ, सचिन भोसले तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले.प्राचीन शिलालेखांच्या रूपाने आपल्या भूमीचा इतिहास आजही दगडांमध्ये जिवंत आहे. त्या वारशाचे जतन करणे हीच आपल्या इतिहासाला खरी अभिवादन ठरेल.
