श्रीगोंद्यात काँग्रेसचे ट्रॅक्टर रॅलीद्वारे तीव्र आंदोलन, शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी

श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षच्या वतीने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करून निषेध व्यक्त करताना आंदोलनकर्ते.

कांद्याला २५ रुपये हमीभाव द्या; फसवा शासन निर्णय रद्द करा

 

श्रीगोंदा | दिनांक ८ जून 2026

गणेश कविटकर

 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी प्रति किलो किमान २५ रुपये हमीभाव तात्काळ जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजी जाहीर केलेला शेतकरीविरोधी व दिशाभूल करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले व अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करून निषेध नोंदविला.

आंदोलकांनी सांगितले की, सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने प्रति किलो २५ रुपये हमीभाव जाहीर करणे आवश्यक आहे. तसेच २ जून रोजी जाहीर करण्यात आलेला शासन निर्णय हा शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून तो तात्काळ रद्द करून शेतकरीहिताचे ठोस निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी शासनाला इशारा देत सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर येत्या आठ दिवसांत विविध मार्गांनी अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किरण पाटील, तालुकाध्यक्ष संतोष भोईटे, शहराध्यक्ष ऍड. सुमित बोरुडे, महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीता दराडे, युवक काँग्रेस अध्यक्ष विकास काळे, सरपंच भगवान कणसे, महेश दरेकर, डॉ. बायकर, चेअरमन शहाजी खेडकर पाटील, शंकर कोठारी, संदीप दहतोंडे, जितू पाटोळे, निलेश उबाळे, विजय बारगुजे, उपसरपंच राम घोडके, संतोष सोनवणे, संदीप वागस्कर, सोहेल शेख यांच्यासह अनेक शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर आंदोलकांच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.