अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट”; नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी

अहिल्यानगर | दि. 08 जून 2026

गणेश कविटकर

 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ८ ते ९ जून २०२६ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार मेघगर्जना व वीजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये. वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच गडगडाटी वादळाच्या काळात कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळावा आणि विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर तसेच धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे.

मोकळे मैदान, झाडे, टॉवर, ध्वजस्तंभ, विद्युत खांब, धातूचे कुंपण आदी ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जाहिरात फलक (होर्डिंग) परिसरात उभे राहणे टाळावे. वीज चमकत असताना उघड्यावर अडकल्यास गुडघ्यावर बसून डोके खाली घेऊन स्वतःचे संरक्षण करावे, असा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.

धरण, नदी किंवा कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे. वादळी वारे, पाऊस व गारपिटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि जनावरांचेही सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांचे दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४, २३५६९४०, तसेच ११२ आणि १०७७ (टोल फ्री) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.