लोहोबाईच्या विहिरीची स्मृती जपणारा मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवज
दि. 07 जून 2026 गणेश कविटकर
कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 3
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे आढळून आलेला मोडी लिपीतील शिलालेख अठराव्या शतकातील जलव्यवस्थापन, लोककल्याणाची भावना आणि धार्मिक परंपरांचा मौल्यवान इतिहास उलगडून दाखवतो. श्री भैरवनाथ महादेव मंदिराशेजारी असलेल्या प्राचीन बारवेवर कोरलेला हा शिलालेख इ.स. १७६२ मधील ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा जिवंत पुरावा ठरत आहे.
श्री भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या बारवेच्या कमानीवर हा तीन ओळींचा कोरीव शिलालेख आढळतो. वातावरणाचा परिणाम होऊन काही अक्षरे अस्पष्ट झाली असली तरी त्याचा कोरीवपणा आजही कायम आहे. शिलालेखाचा छाप घेतल्यानंतर त्यावरील मजकूर स्पष्टपणे वाचता येतो.
शिलालेखातील मजकूर पुढीलप्रमाणे आहे –
“श्री लोहोबाईची इहिर ।
धनाजी मतकर ।
सके १६८४ मध्ये”
या लेखाचा अर्थ असा की, शालिवाहन शक १६८४ अर्थात इ.स. १७६२ मध्ये धनाजी मतकर यांनी लोहोबाईच्या नावाने ही विहीर बांधली. त्या काळात विहिरी आणि बारवा हे पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्रोत असल्याने त्यांचे बांधकाम हे लोककल्याणाचे महत्त्वपूर्ण कार्य मानले जात असे.
शिलालेखात लोहोबाई या देवतेचा उल्लेख असल्याने जलस्रोत आणि धार्मिक श्रद्धा यांचे निकटचे नातेही अधोरेखित होते. महाराष्ट्रात जलस्रोतांना स्थानिक देवतांच्या नावाने समर्पित करण्याची परंपरा प्राचीन काळापासून दिसून येते. त्यामुळे जलस्रोतांचे पावित्र्य टिकून राहून त्यांच्या संवर्धनाची सामुदायिक भावना बळकट होत असे.
या शिलालेखातील धनाजी मतकर यांचा उल्लेख विशेष महत्त्वाचा मानला जातो. अशा नोंदींमुळे त्या काळातील स्थानिक दाते, गावचे प्रमुख आणि सार्वजनिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळते. त्यामुळे स्थानिक इतिहास आणि सामाजिक परंपरांच्या अभ्यासासाठी हा शिलालेख महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतो.
शके १६८४ (इ.स. १७६२) ही कालनोंद या लेखाचा निश्चित कालखंड दर्शवित असल्याने अठराव्या शतकातील ग्रामीण समाजजीवन, जलव्यवस्था आणि धार्मिक परंपरांचा अभ्यास करण्यासाठी हा शिलालेख उपयुक्त ठरतो. लोककल्याणकारी जलव्यवस्था, दानधर्माची भावना आणि स्थानिक देवतांवरील श्रद्धा यांचा संगम या अल्पाक्षरी शिलालेखातून स्पष्टपणे दिसून येतो.
सदर शिलालेखाचे संशोधन राजेश पोपट इंगळे यांनी केले असून वाचन अनिल किसन दुधाणे यांनी केले आहे. या शोधकार्य व शिलालेखाचा छाप घेण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे दिगंबर भुजबळ, सचिन भोसले तसेच स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.आजही बहिरोबावाडीतील हा शिलालेख लोककल्याणासाठी उभारलेल्या जलस्रोतांची परंपरा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व पुढील पिढ्यांसमोर जपून ठेवत आहे.
