आर्थिक साक्षरतेशिवाय आर्थिक सुरक्षितता अशक्य; घराघरात पैशांबाबत खुली चर्चा व्हावी – राजेश देशपांडे

श्रीगोंदा | दि. 07 जून 2026

 गणेश कविटकर

डॉक्टर, अभियंता, सीए यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत; मात्र सुजाण आणि जबाबदार गुंतवणूकदार घडविण्यासाठी कोणताही स्वतंत्र अभ्यासक्रम नसल्याने अनेक शिक्षित व अशिक्षित नागरिक अधिक परताव्याच्या आमिषाला बळी पडून आर्थिक फसवणुकीचे शिकार होत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी घराघरात आर्थिक विषयांवर खुली चर्चा होणे आणि वृत्तपत्र वाचनाची सवय लागणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन देशपांडे इन्व्हेस्टमेंटचे संचालक तथा आर्थिक कौशल्य विकास अभियानाचे समन्वयक राजेश देशपांडे यांनी केले.

येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आर्थिक सुरक्षा व ग्राहक जागरूकता मेळावा तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. सुनीता खेतमाळीस होत्या.

राजेश देशपांडे म्हणाले, “झटपट श्रीमंत होता येत नाही. रिझर्व्ह बँक आणि विविध वित्तीय नियामक संस्था सातत्याने जनजागृती करत असतानाही अनेक गुंतवणूकदार भूलथापांना बळी पडतात. ही केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक समस्या आहे. जीवनात पैशाला महत्त्व आहे, परंतु त्यासाठी बचतीची सवय आणि आर्थिक शिस्त आवश्यक आहे. आपला पैसा कोणत्या संस्थेत आणि कसा गुंतवला जातो, याची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे. शालेय स्तरावरही आर्थिक साक्षरतेचे शिक्षण देण्याची गरज आहे.”

यावेळी बोलताना वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेटच्या अध्यक्षा सौ. सायली वाडगे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, “गरजू मित्राच्या उपचारासाठी निर्माण झालेली आर्थिक अडचण पाहून स्व. विठ्ठलराव वाडगे यांनी सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. गेल्या १३ वर्षांत संस्थेने १३ शाखांचे जाळे उभे केले आहे. महिला बचत गट, खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यांसारख्या उपक्रमांमुळे संस्था लोकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.”

देशपांडे यांनी वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेटने गरीब व सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, सामाजिक बांधिलकी जपत उभारलेल्या अशा संस्था राज्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देऊ शकतात.

कार्यक्रमात ठेवीदारांना प्रोत्साहनपर भेटवस्तूंचे लॉटरीद्वारे वितरण करण्यात आले. यामध्ये निकेश काटे यांना चांदीचे नाणे, किसन सप्रे यांना पॉवर बँक तर मनीषा वाल्हेकर यांना इलेक्ट्रिक किटली प्रदान करण्यात आली. तसेच दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९८.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आलेल्या पूर्वा युवराज रणसिंग हिच्यासह विविध गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पालकांसह सत्कार करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्षा सौ. अलका दरेकर, नगरसेविका चांदणी खेतमाळीस, नगरसेवक सुशीलकुमार शिंदे, अमीन शेख, शहाजी खेतमाळीस, चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. रुक्मिणीताई वाडगे, शुभम वाडगे, सौ. मेघना गावडे, संचालक वामन खाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ठेवीदार व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन गायकवाड यांनी केले, तर सोपान गायकवाड यांनी आभार मानले.