दिल्ली वेस स्वच्छतेतून शिवदुर्गकडून नववर्षाची ऐतिहासिक सुरुवात…..

पानिपत वीरांच्या स्मृतींना अभिवादन; वारसा संवर्धनाचा जागर

 

 

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराच्या उत्तर वेसजवळ असलेली, पानिपतच्या रणभूमीशी नाते सांगणारी ऐतिहासिक दिल्ली वेस ही शिंदेशाही ज्वलंत इतिहासाची साक्ष आहे. या दुर्लक्षित पण मौलिक वारसा स्थळाचे जतन व संवर्धन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानिमित्ताने सलग पाचव्या वर्षी श्रमदानातून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने साजरा होणाऱ्या पानिपत शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. दररोज नागरिकांच्या नजरेसमोर असूनही दुर्लक्षित राहिलेल्या दिल्ली वेसेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. २०१८ पासून शिवदुर्गची तरुणाई सातत्याने या वारशाच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.

या मोहिमेत दिल्ली वेसेच्या पूर्व बुरुज परिसरातील काटेरी झुडपे, वाढलेले गवत, चीमुकाटे, प्लॅस्टिक कचरा व साचलेली धूळ स्वच्छ करण्यात आली. सकाळच्या प्रहरी सुमारे दोन तास श्रमदान करून स्वयंसेवकांनी घामाच्या धारांनी पूर्वजांच्या स्मृतींना मानवंदना दिली.

या उपक्रमाचे नेतृत्व शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे मोहिम प्रमुख दिगंबर भुजबळ, उपाध्यक्ष सचिन भोसले व ॲड. गोरख कडूस पाटील यांनी केले. यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे, गडकिल्ले शतकवीर मारुती वागसकर, प्रा. प्रणव गलांडे, नितीन शेळके, चेतन चौधरी, ॲड. महेश क्षीरसागर, ईश्वर कोठारे, यशवंत पोटे, कपिलेश्वर उल्हारे, आविष्कार इंगळे, शंभुराजे कडूस, रोनीत शेळके, शिवकन्या शिव कडूस यांच्यासह तालुक्यातील व दूरवरून आलेल्या अनेक शिवदुर्ग सदस्यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना अध्यक्ष राजेश इंगळे म्हणाले,

“पानिपत वीरांच्या वारसा स्थळांची स्वच्छता करून आम्हाला अत्यानंद मिळतो. संविधानातील ‘वारसा जतन’ हे कर्तव्य आम्ही पूर्ण करीत आहोत. असा समाधानाचा परमानंद कोणत्याही पैशातून मिळू शकत नाही. श्रीगोंद्याचा इतिहास असलेली दिल्ली वेस पुढील पिढीसाठी जतन करणे, हेच आमचे ध्येय आहे.”

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता, समाजामध्ये इतिहासाची जाणीव, वारशाबद्दलची जबाबदारी आणि तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा ठरत आहे.

 

( गणेश कविटकर, श्रीगोंदा )