श्रीगोंदा नगरपालिकेला नवी दिशा; पदभार स्वीकारताना ठाम राजकीय संदेश…
श्रीगोंदा : “नगराध्यक्षपद ही सत्तेची खुर्ची नसून लोकशाही अधिक मजबूत करण्याचे साधन आहे,” असे ठाम आणि परखड शब्दांत सांगत सुनिता संतोष खेतमाळीस यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. सामान्य जनतेच्या विश्वासावरच आपली राजकीय वाटचाल उभी राहील, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी दुःखापासून सुखापर्यंत कायम पाठिशी उभे राहिलेल्या पाचपुते कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या पदभार सोहळ्याने श्रीगोंदा शहराच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले. या वेळी बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी, “सर्वसामान्य माणसाच्या वेदना जाणणारी, जमिनीवर पाय असलेली नगराध्यक्षा शहराला मिळाली आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता सर्वांची आहे,” असे ठामपणे सांगितले. विजयी नगरसेवकांनी अहंकार न ठेवता जनतेची सेवा करावी, तर पराभूत उमेदवारांनीही नाराजी बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी हातात हात घालून काम करावे, असे स्पष्ट आवाहन आमदार पाचपुते यांनी केले. शहरासह वाडी-वस्तींच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत शास्ती माफीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, अधिकारी व कर्मचारी यांनी सकारात्मक सहकार्य करावे, जात–धर्म न पाहता विकास हेच एकमेव धोरण राहील, असा स्पष्ट राजकीय संदेश त्यांनी दिला. नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय, पालिकेत जनता दरबार सुरू करण्याचा मानस, तसेच नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सभागृहात अधिक वेळ देऊन लोकांच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करावी, यावरही आमदार पाचपुते यांनी भर दिला. “निवडणुकीत कोणी काय भूमिका घेतली, कोणी अडथळे आणले याची मला पूर्ण माहिती आहे; वेळ आल्यावर ते दाखवून देऊ,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. श्रीगोंदेकर जनतेचे आभार मानत त्यांचा विश्वास कधीही डळमळीत होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही नगरपालिकेत ठोस, आदर्श आणि लोकाभिमुख काम करून कायमस्वरूपी ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले. जनतेचे प्रश्न तातडीने सोडवा, सद्गुरू संत शेख महंमद महाराज मंदिराचा प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावा, शहराच्या विकासासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तसेच मुख्यमंत्र्यांकडील कामांसाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या सोहळ्यात नगराध्यक्ष सुनिता संतोष खेतमाळीस यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत अधिकृत पदभार स्वीकारला. यावेळी सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. एकजुटीचा, विकासाचा आणि लोकहिताचा संदेश देत श्रीगोंदा शहराला नवी दिशा देण्याचा संकल्प या पदभार सोहळ्यातून ठळकपणे व्यक्त झाला.
( गणेश कविटकर, श्रीगोंदा )
