सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करणाऱ्या सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने चालू ५१ व्या गळीत हंगामात सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी ३१५० रुपये प्रतिमेट्रिक टन ऊस दर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता ३००० रुपये तात्काळ देण्यात येणार असून उर्वरित १५० रुपये दिवाळीपर्यंत अदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे म्हणाले की, कारखान्याचा चालू गळीत हंगाम सभासद शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार व ठेकेदार यांच्या सामूहिक सहकार्यामुळे सुरळीत व यशस्वीपणे सुरू आहे. आजअखेर २ लाख ८२ हजार ३०३ मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून प्रतिदिन सरासरी ७ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप होत आहे.
कारखान्याचे संस्थापक स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आयुष्यभर जपली. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत आजही नागवडे कारखाना सभासद शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस दर देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नागवडे यांनी स्पष्ट केले.
सहकारी साखर उद्योगासमोर असलेल्या विविध अडचणींवर मात करत नागवडे कारखाना सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील ऊस दराच्या स्पर्धेत नागवडे कारखाना कधीही मागे राहिलेला नाही आणि भविष्यातही राहणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत नागवडे यांनी सांगितले की, मागील गळीत हंगामातील ३०५० रुपये प्रतिटन ऊस दराची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यात आली आहे.
चालू हंगामातील ३१५० रुपयांचा दर हा शेतकऱ्यांच्या विश्वासाला बळ देणारा असून नागवडे सहकारी साखर कारखाना ही तालुक्याची विकासाची गंगोत्री असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकाधिक गाळप झाल्यास संस्थेसह सभासद शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याने फेब्रुवारी–मार्च अखेरपर्यंत ऊस कारखान्यालाच गाळपास देण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, सर्व संचालक मंडळ सदस्य व कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे उपस्थित होते. नागवडे कारखान्याने जाहीर केलेल्या उच्चांकी ऊस दरामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
