श्रीगोंद्यात विकासाची घोडदौड कायम; प्रभाग ७ ब मध्ये शिवसेना मोठ्या फरकाने विजयी होणार

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास खात्यामार्फत राज्यभर सुरू असलेल्या वेगवान विकासकामांचा थेट लाभ श्रीगोंदा शहराला मिळत असून, शहरातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल घडून येत आहेत. या विकासकामांच्या जोरावर शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनलला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

 

जुना प्रभाग क्रमांक ४ (सध्याचा प्रभाग क्रमांक ७) येथे नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून कार्यरत असताना रस्ते, गटारी, नागरी सुविधा आदी मूलभूत प्रश्न प्रभावीपणे मार्गी लावण्यात आल्यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. याच विश्वासाच्या बळावर शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. शुभांगी पोटे तसेच नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी व्यक्त केला.

 

शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ७ ब मधील होणाऱ्या एका जागेच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना पोटे म्हणाले की, प्रभागातील मतदारांशी थेट संपर्क साधताना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली असून, भविष्यातही अशीच विकासाची घोडदौड सुरू राहील, याबाबत नागरिकांमध्ये खात्री निर्माण झाली आहे.

 

“आम्ही केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष विकासकामांच्या जोरावर मत मागत आहोत. पूर्वीच्या काळातील समस्या आणि आमच्या साडेसात वर्षांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेली भरीव कामे नागरिकांनी पाहिली आहेत. नगर परिषद ही नागरी सुविधांचा कणा असून, सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानूनच आम्ही काम केले. त्यामुळेच अशक्य वाटणारे स्वतंत्र पॅनल उभे राहिले आणि नागरिकांच्या विश्वासास पात्र उमेदवार मिळाले,” असे पोटे यांनी ठामपणे सांगितले.

 

यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील रविवार पेठ रस्ता, हनुमान नगरमधील प्रलंबित रस्ते, गटारी, ड्रेनेज आदी विकासकामांची माहिती दिली. तसेच प्रभागातील इंदिरा नगर वसाहत ही श्रमिकांची वसाहत असून, त्यांना हक्काची जागा मिळावी ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ठोस धोरण स्वीकारून पुढाकार घेतला असून, त्यांच्या माध्यमातून येथील रहिवाशांना हक्काची जागा तसेच त्यावरील घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असा ठाम विश्वास मनोहर पोटे यांनी व्यक्त केला.