महाराष्ट्राच्या सह्याद्रीत दिमाखाने उभा असलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा साल्हेर किल्ला पुन्हा एकदा शिवशौर्याचा साक्षीदार ठरला. सह्याद्रीतील गडकोटांची अभ्यासपूर्ण, ऐतिहासिक व संवर्धनात्मक भटकंती करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने शिवदुर्गची ९७ वी गडकिल्ले अभ्यास मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
बारामती, श्रीगोंदा, शिरूर, नगर व पुणे जिल्ह्यातील ३६ शिवप्रेमी सदस्यांनी शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील साल्हेर–सालोटा रेंजची अभ्यासपूर्ण ट्रेकिंग केली. या ऐतिहासिक मोहिमेसाठी बागलाण येथील रोहित जाधव यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाचे योगदान दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया, पदस्पर्श आणि स्वराज्याच्या शौर्यगाथा सांगणारा साल्हेर किल्ला नुकताच युनेस्को जागतिक वारसास्थळ म्हणून मानांकित झालेल्या शिवकालीन १२ ऐतिहासिक दुर्गांमध्ये समाविष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने केवळ भटकंतीपुरती मर्यादा न ठेवता जनजागृती, संवर्धन व इतिहास अभ्यासाचा आदर्श उपक्रम राबवला.
“ना नफा ना तोटा” या तत्वावर आधारित, कोणताही व्यावसायिक किंवा छुपा अजेंडा न ठेवता ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी व युवकांसाठी मोहिमा आयोजित करणारा शिवदुर्ग परिवार आज समाजात वेगळी ओळख निर्माण करत आहे. युनेस्को मानांकित १२ किल्ल्यांची अभ्यासपूर्ण ट्रेकिंग पूर्ण करणारा परिवार म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा नावलौकिक वाढत आहे.
या मोहिमेच्या समारोपावेळी शिवदुर्गची ७६ वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सालोटा–साल्हेर किल्ल्यांच्या परतीच्या वाटेवर पडलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करून ४ गोण्या कचरा गडाखाली आणण्यात आला व साल्हेरवाडी येथे योग्य व्यक्तींकडे सुपूर्द करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाची ही कृती मोहिमेचा आदर्श ठरली.
या मोहिमेत एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला. शिवदुर्गची बुलंद तोफ व श्रीगोंदा तालुक्यातील बारव शोध मोहिमेचे अभ्यासक, आदर्श शिक्षक मारुती वागसकर यांनी युनेस्को मानांकित व महाराष्ट्रातील सर्वात उंच साल्हेर किल्ल्यावर पाऊल ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १०० गडकिल्ल्यांची अभ्यासपूर्वक भटकंती पूर्ण केली. अशी कामगिरी करणारे ते श्रीगोंदा तालुक्यातील दुसरे ट्रेकर ठरले असून, त्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल ट्रेकिंग विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तसेच, साल्हेर किल्ल्यावर पानीपतच्या वीरांच्या वारशाच्या संवर्धनासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात ३६ सदस्यांसह उपस्थित अनेक शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला. या मोहिमेचे महत्त्व, उद्दिष्ट व शासन दरबारी दखल घेण्यासाठी सुरू असलेल्या जनजागृती सह्यांच्या मोहिमेची माहिती देण्यात आली.
इतिहास जपण्याची जाणीव, पर्यावरण संवर्धनाची बांधिलकी आणि शिवविचारांनी प्रेरित तरुणाई घडवण्याचे कार्य करणारे शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन हे केवळ ट्रेकिंग नव्हे, तर शिवशौर्याचा जागता वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा )
