हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्यामुळे होत असलेल्या गंभीर प्रदूषणाने परिसरातील शेती, पिण्याचे पाणी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कारखान्यातून दररोज बाहेर पडणारी काळी राख व बारीक भुसा शेतजमिनीवर साचत असून, त्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनावर व आर्थिक उत्पन्नावर बसत असल्याने कृषी संकट अधिक गडद होत आहे. याचबरोबर रस्त्यावर उडणाऱ्या भुस्यामुळे वाहनचालक, शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांना व श्वसनसंस्थेला गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.
कारखान्यातून बाहेर पडणारे मळी मिश्रित दूषित पाणी पाझर तलावात व परिसरात सोडले जात असल्याने विहिरी व बोअरवेलचे पाणी पूर्णतः दूषित झाले आहे. काही ठिकाणी हे पाणी टँकरद्वारे थेट परिसरात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले असून, हा प्रकार पर्यावरण संरक्षण कायद्यांचा उघड भंग असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले,“शेतकऱ्यांचे आरोग्य, शेती व पाणी हे आमच्यासाठी जीवनमरणाचे प्रश्न आहेत. प्रदूषण नियंत्रण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कारखान्याला राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळेच हा अन्याय सहन करावा लागत आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नये. आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास गौरी शुगर कारखाना बंद पाडण्याचा संघर्ष उभारू.”
या आंदोलनाची दखल घेत श्रीगोंदा तालुका दंडाधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळ व साखर आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तातडीने चौकशी व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
या आंदोलनात अरविंद कापसे, मुकुंदराव सोनटक्के, माऊली मोटे, रफिक इनामदार, नाना शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील शेती, पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
