श्रीगोंदा येथील छावा ट्रेकिंग ग्रुपच्या तब्बल १६० मावळ्यांनी कोयना धरणातील सर्वात उंच बेट किल्ला वासोटा किल्ल्याची मोहीम यशस्वी केली. या मोहिमेदरम्यान सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकजण ज्या भावनेने एकमेकांच्या पाठीशी उभा राहिला, त्याच प्रेरणेने मावळ्यांनी ‘मी अवयव दान व रक्तदान करणार’ अशी हृदयस्पर्शी शपथ घेतली.
शनिवारी संध्याकाळी कोयना धरणाच्या काठी बामनोली येथे कॅम्पिंग करण्यात आले. रविवारी सकाळी ४५ मिनिटांच्या जलप्रवासानंतर सर्व मावळे घनदाट जंगलातील पायवाटांवरून व्याघ्रगड वासोटा किल्ला सर करण्यासाठी निघाले. सुरुवातीला गड सहज सर होईल असे वाटले, मात्र कठीण चढाईदरम्यान अनेकांची दमछाक झाल्याने ते जमिनीवर टेकले. याच वेळी सर्व मावळ्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष करीत महाराजांना मानवंदना दिली आणि नवउर्जा मिळवून पुढील वाटचाल सुरू ठेवली.
या मोहिमेची खास बाब म्हणजे १ वर्षाची रिया चंद्रकांत झरेकर ते ६७ वर्षीय ट्रेकर संभाजी लगड दाम्पत्य असे विविध वयोगटातील ट्रेकर्स एकत्र सहभागी झाले. वनविभागाने परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी केलेले उत्तम काम पाहून सर्वांना समाधानाची भावना मिळाली. योग्य नियोजन आणि जनजागृतीद्वारे किल्ले प्लास्टिकमुक्त ठेवता येऊ शकतात, असा संदेशही मावळ्यांनी दिला.
मोहीमेत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकर रहाणे, डॉ. नितीन खामकर, अनिल शिंदे, स्मितल वाबळे, प्रा. शंकर गवते, नवनाथ दरेकर, शालेय विद्यार्थी, महिला ट्रेकर्स तसेच सैनिक संघटना, श्रीगोंदा येथील हरी ओम योग ग्रुप आणि दौंड मित्र परिवार यांनी सहभाग घेत मोहीमेची रंगत वाढवली.
या अवघड पण मनमोहक मोहिमेचे उत्तम नियोजन छावा ट्रेकिंग ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ खामकर, गोपाळराव डांगे, संतोष जाधव, विकी शिवले यांनी निस्वार्थ भावनेने केले. मोहीम यशस्वी करत सर्व १६० मावळ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अवयव दान व रक्तदानाचा संकल्प करून एक आदर्श निर्माण केला.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
