गौरी शुगरचा दोन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पार; शेतकऱ्यांना प्रथम हप्ता ३१०० रुपये…..

श्रीगोंदा : गौरी शुगरने चालू गाळप हंगामात दोन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. देवदैठण येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या युनिटमुळे गाळप क्षमतेत वाढ झाली असून, या हंगामासाठी तब्बल दहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३२०० रुपये भाव जाहीर करण्यात आला असून त्यातील पहिला हप्ता ३१०० रुपये दिला जाणार आहे.

बोत्रेपाटील म्हणाले, “गेल्या वर्षी आम्ही ३१०६ रुपये भाव आणि ऊसाच्या प्रमाणात दिवाळीत मोफत साखर देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. यंदा साखर कामगारांना २० टक्के पगारवाढ देण्याचा मोठा आर्थिक भार आम्ही स्वीकारला आहे. तरीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पहिला हप्ता ३१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.” यंदाही दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना १०० रुपये अतिरिक्त आणि ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

“कोणी किती भाव देते किंवा देणार आहे याची स्पर्धा आम्ही करत नाही. आमचे एकमेव धोरण म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देणे,” असेही बोत्रेपाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ऊस गाळपास द्यावा, असे आवाहन कार्यकारी संचालक रोहीदास यादव यांनी केले.

 

 

(गणेश कविटकर, श्रीगोंदा)