‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद – पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री प्रतिनिधीची भेट

नागपूर : राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिक, रेडिओ क्षेत्रातील गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया – VOM इंटरनॅशनल फोरम’तर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण स्टेडियम येथे आंदोलन व उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून शेकडो पत्रकार, पदाधिकारी उपस्थित होते.

 

पत्रकारितेशी संबंधित ३३ मागण्यांवर तातडीची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये पत्रकार महामंडळास निधी उपलब्ध करणे, थकीत सरकारी बिले देणे, जाहिरात दरवाढ, डिजिटल माध्यमांना अधिकृत मान्यता, पत्रकार सुरक्षा कायदा प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य–अपघात विमा, निवृत्ती योजना, गृहयोजना कोटा, डिजिटल पोर्टल नोंदणी, रेडिओ कर्मचाऱ्यांना मान्यता आदी महत्त्वाच्या मागण्या समाविष्ट आहेत.

 

पहिल्याच दिवशी आंदोलनस्थळी मुख्यमंत्र्यांचे दूत ओमप्रकाश शेटे यांनी भेट देत शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आ. हेमंत पाटील व आ. बाबुराव कोहळीकर यांनीही भेट देऊन मागण्यांवर चर्चा केली.

 

आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सरकारने स्पष्ट भूमिका घेतल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला. तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.आंदोलनाला पत्रकारांकडून मिळालेला राज्यव्यापी प्रतिसाद लक्षवेधी ठरला.