विद्यार्थ्यांना दिले मिनी ट्रेकिंगचे धडे; डोंगर वारसा स्थळांची अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट…..वाळूंजवस्ती शाळेचा प्रेरणादायी उपक्रम……

श्रीगोंदा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बालवयातच आपल्या इतिहासाची, निसर्गाची आणि वारशाची ओळख करून देण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळूंजवस्ती (टाकळी कडे) शाळेत राबविण्यात आला. पहिली ते चौथीतील एकूण २३ विद्यार्थ्यांना साकळाई व महिंदेश्वर डोंगररांगेत मिनी ट्रेकिंग घडवून आणत छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त डोंगरसंस्कृतीचे बाळकडू देण्यात आले.

 

सकाळच्या प्रहरी सुरू झालेल्या या अभ्यास सहलीत विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पदस्पर्श लाभलेल्या परिसरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले. चिखली येथील साती साकळाई देवी मंदिर, प्राचीन दगडी तलाव, ऐतिहासिक दगडी रांजण आणि प्राचीन राजमार्गावरील वास्तू अवशेषांची माहिती उत्साहाने आत्मसात केली. विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती आणि पूर्वजांच्या वारशाशी जोडण्यासाठी शिक्षकांनी या ठिकाणांचा ऐतिहासिक संदर्भ सांगितला.

 

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरातील प्लास्टिक गोळा करून सोबत आणले आणि योग्य विल्हेवाट लावून ‘प्लास्टिकमुक्त डोंगर’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.

 

यानंतर विद्यार्थ्यांनी कोरेगाव येथील ‘गोविंदबन कृषी पर्यटन केंद्रा’लाही भेट देत निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस मनसोक्त आनंद लुटला. परिसरातील जैवविविधता, शेतीपद्धती आणि ग्रामीण पर्यटन यांचा अनुभव मुलांना समृद्ध करणारा ठरला.

 

मुख्याध्यापक विजय गायकवाड, शिक्षक राजेश इंगळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय वाळूंज यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारसाअभ्यास सहल पार पडली. लहान वयातील मुलांना दूरची सहल नेणे शक्य नसते, परंतु आपल्या परिसरातील वारसा स्थळांची माहिती दिल्यास त्यांच्या अनौपचारिक ज्ञानात भर पडते आणि इतिहासाची आवड वाढते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

वाळूंजवस्ती शाळेने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह इतिहास-जागरूकता, पर्यावरणभान आणि परंपरांची जोड देणारा ठरत असून शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

 

 

(गणेश कविटकर, श्रीगोंदा)