महाराष्ट्रातील दगडी पायऱ्यांच्या ऐतिहासिक बारवांचा वारसा जतन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र बारव मोहिमे’ ला आज नवसंजीवनी मिळाली आहे. मोहिमेचे राज्य मुख्य समन्वयक रोहन काळे (मुंबई) यांनी अहिल्यानगर जिल्हा समन्वयक म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नियुक्तीची घोषणा करताच जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
राजेश इंगळे हे उत्तम गडकिल्ले ट्रेकर, वारसा अभ्यासक, संवर्धक आणि “किल्ले दाखविणारा माणूस” म्हणून ओळखले जातात. मागील अनेक वर्षांत त्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण उपक्रमांमुळे आणि तरुणांना जोडून निर्माण केलेल्या संघटनात्मक कार्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविणे योग्य निर्णय ठरल्याचे वारसा प्रेमींतून बोलले जात आहे.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून २०२१ पासून श्रीगोंदा तालुक्यात बारव संवर्धनाचे मोठे काम सुरु आहे. इंगळे यांच्या नेतृत्वाखालील तरुणांची शिवदुर्ग टीम आजवर अनेक बारवांचे स्वच्छता-अभियान, नकाशांकन व पुनर्स्थापना करून तालुक्यातील वारसा जतनाचे उदाहरण ठरली आहे.
अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात ही जनमोहिम राबविण्यात येणार असून पुढील काही दिवसांत तालुका समन्वयकांची औपचारिक नेमणूक केली जाणार आहे. “बारव मोहिम ही लोकांची मोहिम आहे. इतिहास जपण्यासाठी वेळ देऊ शकणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या चळवळीत सामील करून घेतले जाईल,” असे मोहिमेच्या नेतृत्वाकडून सांगण्यात आले.
‘महाराष्ट्र बारव मोहिम’ अंतर्गत संपूर्ण राज्यभर दगडी पायऱ्यांच्या बारवांचे गुगल मॅपिंग, स्वच्छता व संवर्धन, दीपोत्सव, आर्किटेक्चरल डाक्युमेंटेशन, पर्यटन विकास आराखडा, ड्रोनशूट, चित्रप्रदर्शन, सुशोभीकरण अशा विविध टप्प्यांमध्ये काम हाती घेतले जात आहे. या मोहिमेला स्थानिक प्रशासन, गावपातळीवरील संस्था आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
बारवांचे संरक्षण हे केवळ ऐतिहासिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. हरवणाऱ्या बारवांचा शोध, नोंदणी आणि पुनर्जीवन करण्याचे काम ‘जनतेच्या सहभागातून’ पूर्णत्वास नेण्याचा संकल्प या मोहिमेने केला आहे.
राजेश इंगळे यांच्या नियुक्तीने अहिल्यानगर जिल्ह्यातील वारसा संवर्धनाला नवे बळ आणि दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. “महाराष्ट्राचा पाणीवारसा वाचवण्यासाठी ही चळवळ आता अधिक जोमाने पुढे सरकणार आहे,” अशी भावना वारसा प्रेमींतून व्यक्त होत आहे.
( गणेश कविटकर, श्रीगोंदा )
