महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने गेल्या एका वर्षात घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश सहप्रवक्ते अजित चव्हाण, रघुनाथ पांडे, प्रतिक करपे आदी मान्यवर उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, “विकसित महाराष्ट्र 2047” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले व्हिजन राज्य सरकारने स्वीकारून जलद गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 32 हजार कोटींचे विशेष पॅकेज, दुष्काळी उपाययोजना, पीककर्ज वसुलीला स्थगिती, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायाला कृषीदर्जा, पीकविमा भरपाई प्रक्रियेला वेग

यांसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत 37,166 कामे पूर्ण करून सिंचनक्षमता वाढवण्यात आली. नदीजोड प्रकल्पांना मंजुरी तसेच उपसा सिंचन प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुले, शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर, ऑफशोअर विमानतळाचे नियोजन, 100 गावांत सौरग्राम योजना, नागपूरमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मुंबईतील 238 लोकल गाड्यांसाठी 4,826 कोटी, रेल्वे सेवाविकासासाठी कोट्यवधींची तरतूद यामुळे राज्याच्या प्रगतीला वेग आला असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहिण योजना, 10 जिल्ह्यांत उमेद मॉल, तसेच महिलांसाठी विविध प्रोत्साहन योजनांमुळे महिला सशक्तीकरणात महत्वाची वाढ झाल्याचे ते म्हणाले. नवीन औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, जेम्स अँड ज्वेलरी धोरणांमुळे राज्यात गुंतवणुकीचा वेग वाढला. दावोस परिषदेत 16 लाख कोटींचे सामंजस्य करार, त्यातील 80 टक्के अंमलबजावणीसोबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. 2024-25 मध्ये राज्यात 1,64,875 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अग्र्यातील शिवाजी महाराज यांचे स्मारक, पानिपतला मराठा शौर्य स्मारक, अहिल्यादेवी होळकर जयंती वर्षानिमित्त 5,503 कोटींची तरतूद आदी निर्णयांद्वारे महत्त्वपूर्ण वारसा जपण्याचे कार्य सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

घरगुती व व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात आगामी 5 वर्षे कपात करण्याचा एमईआरसीने आदेश दिला असून, महावितरणचा हा ऐतिहासिक प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राला 30 लाख घरे मंजूर झाली असून 4,91,278 घरे पूर्ण झाली आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 2,399 आजारांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महसूलमंत्री म्हणाले, “डिजिटल सेवांमुळे पारदर्शकता वाढली, प्रामाणिक प्रशासनाची नवी व्याख्या निर्माण झाली. गेल्या एका वर्षात महाराष्ट्राने विकासाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत.”