श्रीगोंदा – नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान केंद्रांबाहेर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. निवडणूक विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, एकूण 79.84% मतदान झाले आहे.
बहुचर्चित श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली होती. शहरातील ३२ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावलेला दिसला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान झाल्याची माहिती विभागाने दिली. दुपारनंतर काही काळ मतदानाचा वेग मंदावला, मात्र संध्याकाळी मतदानाची वेळ संपत आली तसतसे केंद्रांवर अचानक गर्दी वाढली. ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याने ही गर्दी उसळल्याची चर्चा शहरात रंगली.
प्रभाग क्रमांक पाचमधील एका केंद्रावर किरकोळ वादावादीचा प्रकार घडला. त्याव्यतिरिक्त सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार विक्रम पाचपुते, तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे, ज्योती खेडकर, गौरी भोस व सुनीता खेतमाळीस यांनी विविध केंद्रांना भेट देत स्थितीचा आढावा घेतला.
प्रत्येक प्रभागातील उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहनांची सोय करून देत मतदारांची उपस्थिती सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन डोंगरे व पुष्पगंधा भगत यांनी दिवसभर मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले. पोलिस प्रशासनाकडूनही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संध्याकाळी साडेपाचनंतर आमदार विक्रम पाचपुते यांच्या ‘माऊली’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी उसळली. फटाके, गुलाल आणि ‘विजय आमचाच’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. आमदार पाचपुतेही या उत्साहात सहभागी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने आधी घोषित केलेल्या वेळापत्रकात बदल करत मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले. आदेश अचानक आल्यानं निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
मतदान पेट्या पेडगाव रस्त्यावरील गोदामातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन डोंगरे यांनी सांगितले. स्ट्राँग रूमला चोवीस तास सशस्त्र सुरक्षा तर दिवसातून दोन वेळा राजपत्रित अधिकाऱ्यांची भेट असेल. सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभे करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही ढिलाई ठेवली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
