सह्याद्रीच्या कठीण घनदाट अरण्यात, कोयना–जावळीच्या गभीर खोऱ्यात वसलेला वासोटा किल्ला अलीकडेच इतिहासप्रेमींच्या जयघोषाने दुमदुमला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या ९६व्या गडकिल्ले मोहिमेद्वारे पानिपत वीरांच्या वारसा संवर्धनासाठीची ‘एक सही’ मोहीम अभिमानाने पार पडली.
अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत ५२ शिलेदारांनी सहभाग घेतला. वासोटाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर निष्ठेने गडपूजन झाल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे आपली स्वाक्षरी करून पानिपत वीरांचा इतिहास जपण्याचा संकल्प केला. “जितके सह्याद्रीचे किल्ले महत्त्वाचे, तितकाच आपला स्थानिक वारसाही अनमोल आहे,” अशा भावना शिलेदारांनी व्यक्त केल्या.
शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीने यापूर्वी कलावंतीणदुर्ग सुळक्यावरून हीच मोहीम सुरू केली होती. आता वासोटा किल्ल्यावरून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी आणि इतिहास जाणकार यांचे प्रचंड समर्थन या उपक्रमाला मिळत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पानिपत वीरांचा वैभवशाली इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समिती सातत्याने पुढाकार घेत आहे.
श्रीगोंदा परिसरात आजही पानिपत युद्धाची साक्ष देणारे वाडे, वेस, बारव, मंदिरे आणि समाधीस्थळे उभी आहेत. या वारसास्थळांचे संवर्धन, दस्तऐवजीकरण आणि जतन करण्यासाठी शिवदुर्ग परिवार गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. या ‘एक सही मोहिमे’द्वारे जमा झालेला सर्व माहितीचा डाटा लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
या उपक्रमात डॉ. चंद्रशेखर कळमकर, प्रदीप दिगंबर भुजबळ, प्रा. प्रणव गलांडे, चेतन चौधरी परकाळे, डॉ. अभय शिंदे, राजेंद्र भापकर, विजया लंके यांसह असंख्य शिवदुर्ग शिलेदारांनी मोलाचे योगदान दिले आहे.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
