श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- गेल्या साडेसात वर्षांत राबवलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर मंगळवारी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेनेच्या पॅनेलला नगराध्यक्ष पदा सह सर्व २२ जागांवर विजय मिळवून द्या, असे आवाहन माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकार परिषदेत केले.
पोटे म्हणाले, “उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत श्रीगोंद्याचा विकास जिल्ह्यात नावलौकिक निर्माण करणारा ठरेल.”इंदिरानगर वसाहतीतील रहिवाशांच्या घरकुल प्रश्नाबाबत शिंदे यांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा धाडसी निर्णय मंत्री शिंदे यांनी घेतला. त्याच धर्तीवर श्रीगोंदा नगरपरिषदेतही कंत्राटी कामगारांना स्थैर्य देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ.” तसेच शहरात सर्व सोयीसुविधांनी युक्त रुग्णालय उभारण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
पोटे यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेताना सांगितले की सर्व प्रभागांत रस्ते आणि पेव्हिंग ब्लॉकची कामे, बाजारात ओटे, शेड, प्रकाशयोजना, बगीचे आणि ओपन स्पेस डेव्हलपमेंट,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक व क्रांतीसुर्य महात्मा फुले स्मारक,ईदगाह मैदान विकास “जनतेने दिलेले पद हे केवळ सन्मानाचे नव्हे तर जबाबदारीचे मानून आम्ही दररोज नगरपरिषदेत हजर राहून जनता प्रश्न सोडवले,” असे सांगत त्यांनी सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
