अपक्ष जयश्री कोथिंबीरे यांचा शिवसेनेला (शिंदे गट) महत्त्वाचा पाठिंबा

श्रीगोंदा – स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे आकार घेत असताना अपक्ष उमेदवार आणि भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयश्री कोथिंबीरे यांनी शिवसेना उमेदवारांना दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरला आहे. नगरसेवक पदाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र “भाजप प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य मान देण्यात कमी पडते” असे म्हणत त्यांनी शिवसेना उमेदवार भामाताई कोथिंबीरे आणि बाबू धुमाळ यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला.

 

पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की पक्षप्रवेश हा पुढील टप्पा असून सध्या ते निव्वळ शुभांगी पोटे यांच्या कार्यक्षमतेवर आणि विकासाभिमुख भूमिकेवर विश्वास ठेवून शिवसेनेसाठी काम करत आहेत.

 

शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी पोटे यांनी जयश्री कोथिंबीरे यांच्या निर्णयाचे स्वागत करत, “या पाठिंब्यामुळे आमच्या प्रचाराला बळ मिळाले असून आगामी निवडणुकीत मतदारांचा विश्वास अधिक दृढ होईल” अशी प्रतिक्रिया दिली.