भाजपच्या प्रचार शुभारंभात झालेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर थेट निशाणा साधला. “माझ्यावर नेत्यांना फसवल्याचा आरोप करणाऱ्या आमदारांनी स्वतः १९८० ते २०१४ दरम्यान किती पक्ष बदलले, किती नेत्यांना फसवले आणि दरवेळी कोणती नवे चिन्हं स्वीकारली, याचा आरशात पाहून विचार करावा,” अशी कडक टीका पोटे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
भाजपच्या पॅनल शुभारंभावेळी आमदार पाचपुते यांनी २०१९ च्या नगरपरिषद निवडणुकीत पोटे यांना साथ देणाऱ्या नेत्यांनी या निवडणुकीत दुरावा ठेवल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर प्रत्युत्तरादाखल पोटे म्हणाले, “विरोधकांकडे आमच्यावर आरोप करण्यासारखे काहीच नाही, म्हणून ते आधारहीन टीकांकडे वळत आहेत. जनतेला दिशाभूल करण्यासाठी खोटे आरोप पसरवण्याची ही त्यांची जुनी पद्धत आहे.”
विकासकामात ‘मलई खाल्ल्याचा’ आरोपही पोटे यांनी फेटाळून लावत, “निकृष्ट दर्जाच्या दुभाजकामुळे पडणारी सिमेंटची मलई नेमकी कोणाच्या जवळच्या ठेकेदाराने केली, हे शहरातील प्रत्येक नागरिकाला दिसत आहे. या आरोपांचे खरे उत्तर आमदारांनी स्वतः द्यावे,” असे जोरदार प्रत्युत्तर दिले.
शेवटी पोटे यांनी आत्मविश्वासाने म्हटले, “निवडणुकीत वारंवार आश्वासने देऊन नंतर विसरण्याची राजकारणाची जुनी पद्धत आता जनता ओळखू लागली आहे. काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी आहे. येणाऱ्या निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवू, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.”
