श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव गावात बुधवारची संध्याकाळ काळ बनून आली. जनावरांसाठी चारा आणण्यासाठी निघालेल्या ट्रॅक्टरचा ताबा सुटला आणि क्षणात भीषण दुर्घटना घडली. ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला आणि त्याखाली दबून दोन निरागस चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण गावात एकच हळहळ पसरली.
मयत मुलांची नावे –
🔸 प्राप्ती किरण महाडिक (वय १०)
🔸 शिवांश किरण महाडिक (वय ४)
मुलांची आई कावेरी किरण महाडिक (वय ३५) व आणखी एक लहान मुलगी क्रांती किरण महाडिक गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
महाडिक परिवारावर दु:खाचा वज्राघात कोसळला आहे. क्षणात दोन घरच्या कळ्या हिरावल्या गेल्याने गावभर शोककळा पसरली. मृत मुलांच्या सहाध्यायांसह संपूर्ण गाव अश्रू ढाळत आहे.
दररोजच्या जगण्यासाठी, आपल्या जनावरांसाठी चारा आणताना घडलेली ही दुर्घटना किती निर्दयी होती याची साक्ष सगळ्यांच्या व्यथित चेहऱ्यावर उमटली आहे. गावकऱ्यांनी या दुःखद प्रसंगी महाडिक परिवाराला धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र “देवाने एवढं का केलं?” हा एकच प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे.
या हृदयद्रावक घटनेने उक्कडगावात शोककळा पसरली असून महाडिक परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावातील वातावरण हळवे झाले असून दोन चिमुकल्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
